JAYANT PATIL ON AMIT SHAH: २०२४मध्ये निवडून येणार नसल्यानेच २०२९चे गाजर; जयंत पाटलांचा अमित शहांना टोला

मुंबई : ‘हरियाणा, जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. पण भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन बसण्याची वेळ आली आहे. म्हणजे महाराष्ट्रात किती मोठा खड्डा पडला आहे, हे दिसते. २०२४मध्ये तर आपण निवडून येणार नाही म्हणूनच २०२९चे विधान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहे,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. महायुती सरकारच्या ढिसाळ कारभारांची एक ‘चार्जशीट’ राष्ट्रवादीने तयार केल्याचीही माहिती त्यांनी दिली. राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ हे गीत पक्षाने तयार केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षातर्फे ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ‘महाराष्ट्राने दिल्लीच्या तख्तालाही गुडघे टेकवायला लावले. या देशाच्या राज्यकारभाराचे पान हे महाराष्ट्राशिवाय कधीच हललेले नाही’, असे ते म्हणाले. मात्र २०१४ पासून आलेल्या केंद्रातील मोदी सरकारमुळे आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून असंवैधानिकपणे सत्तेवर आलेल्या महायुतीमुळे दैदिप्यमान महाराष्ट्राचे खच्चीकरण केले, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.

‘राष्ट्रवादी’ पक्षाचा लाँग मार्चराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज, बुधवारी (२ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता पक्षातर्फे गांधी पुतळा, मंत्रालय ते हुतात्मा चौक असा लाँग मार्च काढला जाणार आहे. या मार्चमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-10-02T01:05:42Z dg43tfdfdgfd