JALNA NEWS | स्वाभिमानीचे ७ ऑक्टोबरपासून मुक्काम ठोको आंदोलन

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील मोसंबी, डाळिंब, आंबा, द्राक्ष व केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहार २०२३ चा मंजूर झालेला फळ पीकविमा अद्यापर्यंत मिळाला नाही. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ७ ऑक्टोबर रोजी एचडीएफसी अर्गो विमा कंपनीच्या जालना येथील कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी एचडीएफसी अर्गो या विमा कंपनीच्या राज्य प्रमुख प्रतिनिधीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत जालना जिल्ह्यातील मोसंबी, डाळिंब, आंबा, द्राक्ष व केळी या फळपिकाचा विमा मंजूर झालेला असतानाही तो अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही.

शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, अधिसूचित पिकाचा संरक्षण कालावधी संपल्यानंतर तीन आठवड्यांत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणे बंधनकारक आहे. आंबा, केळी, द्राक्ष व डाळींब या फळपिकांचा विमा संरक्षण कालावधी ३१ मे रोजी संपला. तर मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी हा १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. विमा संरक्षण कालावधी संपून चार महिने उलटले तरीही अद्याप शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळालेली नाही. शासन निर्णयानुसार विमा संरक्षण कालावधी संपल्यावर तीन आठवड्यात विमा रक्कम शेतकऱ्यांना देय राहील अशी तरतूद आहे. मात्र एचडीएफसी अर्गो विमा कंपनीला या शासन निर्णयाच्या तरतुदीचा विसर पडलेला दिसत आहे.

विम्याचा परतावा नाही

आंबिया बहार अर्थात रब्बी हंगाम २०२३ चा फळ पीकविमा जिल्ह्यातील ४८ हजार ९४३ शेतकऱ्यांनी भरला. त्यात आंबा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ४० हजार ३८ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचा फळ पीकविमा केला होता. या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत विमा कंपनीकडून परतावा मिळालेला नाही.

2024-10-02T09:07:04Z dg43tfdfdgfd