ISRAEL IRAN WAR | इराणने इस्रायलवर डागली २०० क्षेपणास्त्रे; युद्ध भडकण्याची चिन्हे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने इस्रायलवर मंगळवारी रात्री 10 वाजता २०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायल सरकारने आपल्या नागरिकांना बॉम्ब शेल्टर गृहांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमेरिकेनेही इराणला गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा इशारा दिला असून अध्यक्ष जो बायडन यांनी इराणचे क्षेपणास्त्रे उध्वस्त करण्याचे आदेश अमेरिकन सैन्याला दिले आहेत. (Israel Iran War)

दमास्कसमधील इराणी वाणिज्य दूतावासावर झालेल्या प्राणघातक इस्रायली हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून एप्रिलमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर केलेला हा दुसरा हल्ला होता. हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह आणि इराणी ब्रिगेडियर जनरल अब्बास निलफोरुशन यांना गेल्या आठवड्यात इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेले. तसेच जुलैमध्ये तेहरानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हमास नेता इस्माइल हनीह यांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचे इराणने म्हटले आहे. इराणकडून अचानक असे काही घडेल, याची गुप्त खबर इस्रायलला मिळालेली होती. त्यामुळे या हल्ल्यांपूर्वीच तेल अवीवसह देशभरात नागरिकांनी सतर्क राहावे, बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घ्यावा म्हणून सायरन वाजवले गेले होते. अमेरिकेनेही इराणकडून असा हल्ला शक्य असल्याचा इशारा दिलेला होता. इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर आता अमेरिकेने इराणला गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा इशारा दिला आहे.

जो बायडन यांचे अमेरिकन सैन्याला आदेश

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी अमेरिकन सैन्याला इस्रायलच्या संरक्षणासाठी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलला लक्ष्य करणारी इराणी क्षेपणास्त्रे उध्वस्त करण्यासही त्यांनी सांगितले आहे. बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस हे दोघेही इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यावर लक्ष ठेवून आहेत. बायडन यांनी राष्ट्रीय सुरक्षा टीम सोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत इराणच्या इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत चर्चा करण्यात आली. या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आणि इस्रायलमधील अमेरिकन कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी युनायटेड स्टेट्स कशी तयार आहे याबाबत माहिती घेतली.

2024-10-02T03:42:52Z dg43tfdfdgfd