जालना : शहरासह जिल्ह्यात नवरात्रमहोत्सव ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शहरातील सीटीएमकेसह विविध ठिकाणी नवरात्र- महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या गरब्याच्या कार्यक्रमात आगामी नऊ दिवस गरबाप्रेमी युवक व युवती विविध गाण्यांवर थिरकरणार आहेत. युवक-युवतींनी गरब्यासाठी खास कॉस्च्युम तयार केले आहेत.
गणेशोत्सवानंतर जालनेकरांनी नवरात्र-महोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. शहरात गुजराती समाज मोठ्या संख्येने आहे. गुजराती समाजात गरव्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसावर असतानाच गरबा खेळण्यासाठी गरवाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गरव्यासाठी विविध गाण्यावर डान्स बसविले आहेत. गरब्यामध्ये नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला जातो. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही ट्रॅकवर गरबा खेळला जातो. ५ वर्षांच्या बाल गरबाप्रेमींपासून ६० वर्षाचे गरबाप्रेमी आजोबा गरब्याचा आनंद घेताना दिसतात. मध्यंतरीच्या काळात वेस्टर्न गरब्याची धूम होती. प्रामुख्याने तरुणाई या गरब्याकडे आकर्षित होत होती. मात्र आता कल बदलत असल्याचे चित्र दिसत असून पुन्हा पारंपरिक गरब्याकडे ते वळत असल्याचे चित्र आहे.
गरव्यानिमित्त बाजारात विविध आकर्षक पोशाख विक्रीसाठी आले आहेत विविध आकारातील टिपऱ्या, डोक्याला लावायच्या केशरी रिबीनी, पोषाखाला मॅचिंग बूट खरेदी करून युवक-युवती रात्री उशिरापर्यंत विविध गाण्यांवर थिरकताना दिसणार आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये अनोळखी व्यक्तीपासून शांतता भंग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
2024-10-02T09:58:09Z dg43tfdfdgfd