नगर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत नगर, राहाता व कोपरगाव या तीन तालुक्यांतील ६८१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मका, तूर व कांदा पिकांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका ११३४ शेतकऱ्यांना बसला आहे.
याशिवाय २४ ते २८ या कालावधीतील सततच्या पावसाने श्रीगोंदा व अकोले या दोन तालुक्यांतील ४११ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकंदरीत परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील १०९२ हेक्टर क्षेत्राला बसला आहे.
सप्टेंबर महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यांत दमदार पाऊस झाला नाही. मात्र चौथ्या आठवड्यात परतीच्या पावसास प्रारंभ झाला. खरीप पिके जोरदार असतानाच २४ ते २८ सप्टेंबरच्या कालावधीत परतीचा पाऊस सुरू झाला. २६ सप्टेंबरमध्ये राहाता तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. या अतिवृष्टीचा फटका १६ गावांतील २५० हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना बसला.
कांदा, कापूस, सोयाबीन व मका या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. २४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये १८ गावांतील ३५१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके बाधित झाली. ४१० शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.
२४ सप्टेंबर या दिवशी नगर तालुक्यात देखील अतिवृष्टीची नोंद झाली. या तालुक्यातील ६ गावांतील १५६ शेतकऱ्यांच्या ८० हेक्टर क्षेत्रावरील कांदा, सोयाबीन, कापूस मका आणि तूर या पिकांचे ३३ टक्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
सततच्या पावसाने श्रीगोंदा व अकोले तालुक्यांतील ४११.३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके बाधित झाली. अकोले तालुक्यातील एका गावातील ६१.७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे १६३ शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील तीन गावांतील ७६७ शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसला. त्यांच्या ३५० हेक्टरांवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.
2024-10-01T08:16:28Z dg43tfdfdgfd