छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या जुन्या विकास आराखड्यात आस्तित्वात असलेला काल्डा कॉर्नर ते कडा कार्यालय हा १५ मीटर प्रस्तावित रस्ता नव्या प्रारूप आराखड्यात रद्द करण्यात आला होता. परंतु सुधारित विकास आराखड्यात या रस्त्याचा पुन्हा समावेश केल्याने येथील मालमत्ताधारकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या समावेशामुळे ३०० घरांवर बुलडोझर चालण्याची दाट शक्यता असून मालमत्ताधारकांनी प्रधान सचिवांकडे आक्षेप दाखल केले आहेत.
तब्बल ४० वर्षांनंतर शहराचा नवा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र यापूर्वीच्या आराखड्याप्रमाणेच यावेळीही आराखड्यात अनेक घोळ करण्यात आले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी मनपाकडे पैसे नसल्याने हा विचार करूनच यंदाच्या आराखड्यात मनपाने रस्ते व इतर सोयीसुविधांसाठी आरक्षण टाकणे आवश्यक होते. तसेच जुन्या आराखड्यातील अत्यावश्यक रस्त्यांचे आरक्षण जैसे थेच ठेवणे आवश्यक होते. मात्र राज्य शासनाने या कामासाठी नियुक्त केलेल्या विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी आराखड्यात अनेक ठिकाणी चुकीचे आरक्षण टाकले. त्यावरून प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर आक्षेपांचा पाऊस पडला.
तब्बल ८ हजारांवर आक्षेप दाखल झाले. त्यासर्वांची सुनावणी घेऊन विशेष अधिकारी देखमुख यांच्या समितीने आराखड्यातील बहुतांश चुकीचे आरक्षण रद्द करून सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला.
हा आराखडा सध्या राज्य शासनाकडे सादर केला आहे. या आराखड्यातही समितीने यापूर्वीच्या मंजूर विकास आराखड्यातील रद्द असलेले रस्ते सुधारित विकास आराखड्यात समाविष्ट केले आहेत. त्यापैकी एक काल्डा कॉर्नर ते सौजन्यनगर, कुशलनगर, सिंधी कॉलनीमार्गे कडा कार्यालय हा रस्ता आहे. नव्या प्रारूप आराखड्यात हा रस्ता टाकण्यात आला नाही. तेव्हा सुधारित आराखड्यात रस्ता आलाच कसा, असा सवाल कलावती तोनगिरे, शशिकांत काळे, राजू तोनगिरे, दिलीप कासलीवाल, विनोद छबलानी, प्रदीप गुणवाणी, अमरदीप छटवाल, रतन कुचे यासह शेकडो मालमत्ताधारकांनी उपस्थित केला आहे.
शहरासाठी तयार केलेल्या नव्या डीपीमध्ये अनेक घोळ झाले आहेत. सुधारित आराखडा तयार करताना त्यात अनेक नव्या रस्त्यांचा समावेश केला. यात मोठ्याप्रमाणात तडजोड झाली असावी. त्यामुळेच आक्षेपही घेण्याची संधी विशेष समितीने दिली नाही, असा आरोप या परिसरातील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
काल्डा कॉर्नर ते सौजन्यनगर, कुशलनगर, सिंधी कॉलनी, पंचशीलनगर, नाथनगर, अरिहंतनगर, विष्णूनगर होत पुढे न्यू शांतीनिकेतन कॉलनीहून काल्डा कॉर्नर असा हा रस्ता आहे.
2024-10-02T05:39:06Z dg43tfdfdgfd