पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोसरी विधानसभेचे इच्छुक माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी (दि.३०) भेट घेतली. तसेच, माजी आमदार विलास लांडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांसह शरद पवारांची भेट घेतली.
त्यामुळे भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून कलगीतुरा रंगणार असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी गेल्या महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांना उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली असून, मोर्चेबांधणी केली आहे. अशातच त्यांनी सोमवारी अचानक महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असलेले शरद पवार यांची भेट घेतली.
उमेदवारासाठी आशीर्वाद देण्याची विनंती त्यांनी पवारांकडे केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अजित गव्हाणे यांनी अनेक माजी नगरसेवकांसह शरद पवार यांची तुतारी हातात घेतली आहे. अजित गव्हाणे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.
शिवसेनेचे रवी लांडगे यांनी तसेच, माजी आमदार विलास लांडे यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीत भोसरी मतदारसंघ शिवसेनेला की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार, याबाबत पक्षाचे पदाधिकारी दावे प्रतिदावे करीत आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार आहे, उद्धव ठाकरे यांनी वचन दिले आहे. त्यानुसार, कामाला लागलो असून, मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असलेले शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली.
भोसरी मतदारसंघ हा कुस्ती आखाडा नसून, राजकीय आखाडा आहे. शरद पवार हे राजकारणातील वस्ताद आहेत. मला तिकीट नाही मिळाले तरी, मी महाविकास आघाडीचे काम करणार आहे, असे रवी लांडगे यांनी सांगितले.
भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, विनोद नढे, मोरेश्वर भोंडवे व पदाधिकारी यांनी शरद पवारांची भेट घेतली. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. विलास लांडे यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे व माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पूर्वीच प्रवेश केला आहे; मात्र विलास लांडे हे अजित पवारांसोबत होते. अखेर, त्यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने ते तुतारी फुंकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
2024-10-01T03:27:31Z dg43tfdfdgfd