APPASAHEB DHARMADHIKARI: महाराष्ट्र भूषण दुर्घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारींचा समर्थ बैठकीबाबत मोठा निर्णय

मुंबई: काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील श्री सेवकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या कार्यक्रमासाठी तब्बल २० लाखांची गर्दी जमली होती. परंतु, या श्री सेवकांना दुपारच्या रणरणत्या उन्हात बसावे लागल्याने त्यापैकी १४ जणांचा उष्माघाताने आणि पाण्याच्या कमतरतेने मृ्त्यू झाला होता. ही भीषण दुर्घटना सरकार, प्रशासन आणि अन्य यंत्रणांना खडबडून जागी करणारी ठरली होत. या दुर्घटनेमुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि आप्पासाहेब धर्माधिकारी हे टीकेचे धनी ठरले होते. यानंतर राज्यभरात दिवसा आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली आहे. या सगळ्यातून धर्माधिकारी प्रतिष्ठानानेही एक महत्त्वाचा धडा घेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात आयोजित केलेल्या जाणाऱ्या समर्थ बैठकांबाबत काही बदल करण्यात आले आहेत.

श्री समर्थ बैठकीला मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे जातात. आठवड्यात एक दिवस बैठक होते. जी साधारण अडीच तास असते. पुरूषांची बैठक ही साधारण संध्याकाळी ७.३० नंतर भरते. मात्र, महिलांची बैठक ही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरवली जाते. अनेक ठिकाणी बैठक ही सकाळी १०.३० आणि दुपारी १.३० वाजता असते. पण महाराष्ट्र भूषण दुर्घटनेनंतर उष्माघाताचा त्रास हा अनेकांना जाणवू शकतो, ही गोष्ट समोर आली आहे. अशावेळी आधीच एका कार्यक्रमात उष्माघाताने झालेल्या अप्रिय घटनेची जाणीव ठेवून बैठकीची वेळ ही पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महिलांच्या दुपारच्या बैठका या रद्द करण्यात आल्या असून आता फक्त सकाळी ७.५० ते १० वाजेपर्यंतच या बैठका असणार आहेत. हा निर्णय कायमस्वरुपी असणार आहे की तात्पुरत्या स्वरुपात याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

समर्थ बैठीकीबाबत नेमकी काय सूचना?

श्री सद्गुरू आज्ञेने श्री समर्थ महिला बैठक वेळेबाबत सूचना. वातावरणातील तापमान वाढीमुळे महाराष्ट्रातील सर्व श्री समर्थ महिला बैठक बुधवार ३१ मे पासून बैठकीची वेळ बदलली आहे. येत्या बुधवार पासून सर्व महिला बैठकांची वेळ ही सकाळी ७.५० ते १० वाजेपर्यंत असेल.

सकाळी ७.५० ते ८.०० : श्री मनाचे श्लोक

सकाळी ८.०० ते ८.४५ : श्री मंगलाचरण

सकाळी ८.४५ ते १०.०० : श्री वर्तमान समास

2023-06-01T08:03:37Z dg43tfdfdgfd