फर्दापूर : अजिंठा लेणीतील निर्बंधीत क्षेत्रात तीन ड्रोन कॅमेऱ्यांनी सुमारे पाच तास विनापरवाना घुसाखोरी केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अजिंठा लेणीत विनापरवाना घुसघोरी करणाऱ्या त्या ड्रोनविरोधात वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्याचे संकेत भारतीय पुरातत्त्व विभागाने दिले आहेत. अँटी ड्रोन गन सज्ज पथक अजिंठा लेणीत तैनात करून पोलिसांनी ही आपला इरादा स्पष्ट केला आहे.
युनेस्कोच्या यादीतील संरक्षित राष्ट्रीय स्मारक असलेल्या जगप्रसिध्द अजिंठा लेणीत केंद्र शासणाच्या आखत्यारित येणाऱ्या भारतीय पुरातत्त्व विभागाने अनेक निर्बंध घातलेले असताना व अजिंठा लेणीतील तीनशे मीटर परिघात ड्रोन कॅमेरे उडविण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाने पूर्णपणे प्रतिबंध केलेला असताना शुक्रवारी रात्री तीन अज्ञात ड्रोन कमेऱ्यांनी विनापरवाना अजिंठा लेणीतील निर्वधीत क्षेत्रात घुसखोरी केल्याचे समोर आले. तब्बल पाच तास अजिंठा लेणीसह येथील सप्तकुंड धवधवा व व्हयू पॉइंट परिसरात घिरट्या घातल्याने येथील भारतीय पुरातत्त्व विभाग, पर्यटन महामंडळ व पोलिस प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये खळबळ उडून दिली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त रविवारी (दि.२९) दैनिक पुढारीने प्रकाशित केले होते.
दरम्यान जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेणीत शुक्रवारी रात्री तीन ड्रोन कॅमेऱ्यांनी विनापरवाना घुसखोरी केल्याचे प्रकरण उघडकीस येताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनी अजिंठा लेणीत भेट देऊन भारतीय पुरातत्त्व विभागाचे संवर्धन सहायक अधिकारी मनोज पवार पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल सावळे, पोउनि सुग्रीव चाटे यांच्या पथकासह अजिंठा लेणी, सप्तकुंड, धबधबा, व्हयू पॉइंट परिसरासह अजिंठा लेणीतील राखीव जंगल परिसर पिंजून काढला. रात्रीच्या सुमारास विनापरवाना अजिंठा लेणीतील निर्वधीत क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या ड्रोन संदर्भात काही धागेदोरे मिळतात का याबाबीचा कसून शोध घेतला. यावेळी पोलिसांच्या हाती काहीही लागले नसलेतरी युनेस्कोच्या यादीतील संरक्षित राष्ट्रीय स्मारक असलेल्या अजिंठा लेणीतील निर्बंधीत क्षेत्रातील विनापरवाना ड्रोन घुसखोरी प्रकरण पोलिस प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. शनिवारी रात्रीपासून एक अँटी ड्रोन गन सज्ज पोलिस पथक फर्दापूर पोलिसांनी अजिंठा लेणीत तैनात केले. यापुढे विनापरवाना अजिंठा लेणीच्या निर्बधीत क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यानवर अँटी ड्रोन गन द्वारे थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले आहे.
2024-10-02T05:24:09Z dg43tfdfdgfd