छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटीच्या निधीतून महापालिकेने हडको एन-११ परिसरातील ताठे मंगल कार्यालयाच्या जागेत ३६ कोटी रुपये खर्चुन भव्य तीन मजली इमारत बांधली आहे. यात शहरवासीयांसाठी अद्ययावत सुविधांसह महापालिकेचे पहिले सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले जाणार आहे. यामुळे घाटी, मिनी पाटीवरील ताण कमी होईल. तसेच महागडे उपचार अतिशय स्वतात केले जातील, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये महापालिकेच्या वतीने मोठे विविध आजारांवर उपचार देणारे रुग्णालय चालविले जातात, त्या रुग्णालयातून शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील रुग्णांवर उपचार करण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर महापालिकाही अशाच प्रकारे मोठे रुग्णालय सुरू करण्याच्या तयारीत होती. त्यासाठी कोरोना काळात सुरू केलेल्या चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन रुग्णालयाच्या जागेचा वापर केला जाणार होता. या जागेत अद्ययावत सेवा उपलब्ध करण्याची तसेच खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ विजिटर डॉक्टरांची नियुक्ती करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली होती. मागील काही महिन्यांपासून हा विषय थंड बस्त्यात आहे.
परिसरातील ताठे मंगल कार्यालयाच्या जागेत जी इमारत बांधली आहे, त्या जागेत पहिल्यांदा डोळ्यांचा दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यानंतर तोही प्रलंबित पडला. मनपा शहरात तीन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करणार होती. त्यासाठी स्मार्ट सिटीचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु या तीनपैकी एकच सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. हे रुग्णालय ताठे मंगल कार्यालयाच्या जागेत उभारण्यात आलेल्या ३ मजली इमारतीमध्ये होणार आहे. शहरातील महापालिकेचे हे पहिले अद्ययावत रुग्णालय असणार आहे.
शहरात आरोग्य सेवा देण्यासाठी मनपाने विविध ४५ ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू केले आहेत. त्याद्वारे रुग्णसेवा देण्यात येत आहेत. दुसरीकडे अधिकची सेवा देण्यासाठी आपल्या स्तरावर नागरिकांना उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी सुरपस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले जाणार आहे.
मनपाच्या या नव्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोणत्या आजारांवर उपचार करावे, ज्यामुळे घाटी रुग्णालयावरील ताण कमी होईल. याबाबत येत्या दोन दिवसांत घाटीचे आरोग्य उपसंचालक, अधिछता, सिव्हील सर्जन, मनपा आरोग्य अधिकारी यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये चर्चा होऊन उपचाराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. परस मंहलेचा यांनी दिली.
2024-10-02T08:39:12Z dg43tfdfdgfd