पुणे : बोपोडीत 63 घरे पालिकेकडून जमीनदोस्त
पुणे; पुढारी वृत्तसेवा : जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणार्या इमारतीसह 63 घरे महापालिकेने गुरुवारी कारवाई करीत जमीनदोस्त केली. त्यामुळे रस्त्याचे अनेक दिवस रखडलेले रुंदीकरण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या कारवाईत ज्यांची घरे पाडण्यात आली, त्यांना यापूर्वीच भरपाई, तर काहींना भरपाईसह पर्यायी घरे दिल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हॅरिस पुलापर्यंतचे जुना पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपूर्वी झाले आहे.
परंतु पुणे महापालिकेच्या हद्दीत बोपोडी येथे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्या मिळकतींमुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीचा वेग कमी होत होता. त्यामुळे भूसंपादनासाठी महापालिका प्रशासन 2018 पासून पाठपुरावा करीत होते. मात्र, नुकसान भरपाई, पर्यायी घरांची मागणी यावरून काही जण न्यायालयात गेल्याने भूसंपादनास विलंब होत होता. प्रशासनाने रस्ता रुंदीकरणात बाधित होणार्या घर व दुकान मालकांना भरपाई, तसेच काहींना पर्यायी घरे दिल्यानंतरही काही मिळकतधारक भूसंपादनास विरोध करीत असल्याने रुंदीकरण रखडले होते.
दरम्यान, प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी सकाळी 7 वाजता पोलिस बंदोबस्तात येथील चौकातील दुमजली इमारतीसह लगतच्या तब्बल 63 मिळकती जमीनदोस्त केल्या. या कारवाईसाठी सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, पालिकेच्या भूसंपादन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपअभियंता दिनकर गोजारे, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त खलाटे यांच्यासह 50 अधिकारी, 75 बिगारी आणि 450 पोलिस तैनात करण्यात आले होते. या कारवाईमध्ये तब्बल 4 हजार 600 चौ.मी. जागा ताब्यात घेण्यात आली.
बोपोडी ते दूध डेअरीपर्यंतच्या खडकी कॅन्टोंन्मेट बोर्डाच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले. लष्कराच्या, तसेच लष्कराने लीजवर दिलेल्या मिळकतींसह खासगी मिळकतीही ताब्यात घेण्यात आल्या. बोपोडी चौकातील भूसंपादन झालेल्या जागेपर्यंत रस्ता रुंदीकरण झाले आहे. मात्र, काही मिळकती ताब्यात नसल्याने काम रखडले होते. मात्र, गुरुवारी येथील अतिक्रमण काढल्याने शुक्रवारपासून रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
– विकास ढाकणे,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
The post पुणे : बोपोडीत 63 घरे पालिकेकडून जमीनदोस्त appeared first on पुढारी.
2023-05-26T06:02:07Z dg43tfdfdgfd