पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी नजीक कार आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून सुनिल वाडकर, किशोर कांबडी, विक्रम कांबडी अशी मृतांची नावे आहेत. कामावर जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीये.
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील तलासरी इभाडपाडा येथील सुत्रकार फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनावर अर्टिगा कार क्रमांक जी. जे. २६ ए.बी. ७२१२ या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. महामार्गावर असलेल्या कटमधून दुचाकी जात असताना कारने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे कळते.
या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनिल वाडकर (वय २४), किशोर कांबडी (वय २०) विक्रम कांबडी (वय २४) अशी मृत तरुणांची नावे आहेत. यातील एकाला गंभीररित्या जखमी झाल्याने तलासरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला झाला. अपघातातील तीनही मृत तरुण बारीमाळ आदिवासी पाड्यातील रहिवासी असल्याचे कळते.
घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2023-05-26T11:31:21Z dg43tfdfdgfd