कात्रज परिसरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी

कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल केल्याने मंगळवारी सकाळपासून वाहनचालकांचा गोंधळ उडाला. नियोजनाअभावी कात्रज परिसरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणावर दिवसभर उड्डाणपुलाचे काम थांबविण्याची वेळ आली.

कात्रज चौकात उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू करायचे असल्याने प्रायोगिक तत्त्वावर मुख्य चौकातील वाहतूक बंद करून ती नवले पुलाच्या बाजूने गर्डर टाकण्यात आलेल्या दोन पिलरच्या खालून वळविण्यात आली. याबाबत प्रशासनाने कोणतेही पूर्वनियोजन केले नव्हते. यामुळे सातारा रस्त्यावर शंकर महाराज उड्डाणपुलापासून ते कात्रज घाटापर्यंत आणि नवले पुलापासून ते कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

मांगडेवाडी, संतोषनगर, कात्रज गाव, सच्चाईमाता परिसर, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द, दत्तनगर चौक, गुजर-निंबाळकरवाडी रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, नर्‍हे गाव, अशा विविध भागांत याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. तसेच, या परिसरातील लहान-मोठ्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच विद्यार्थी, नोकरदार यांना वेळेवर इच्छितस्थळी पोहचता आले नाही. या वेळी पोलिस प्रशासनाबरोबर काही नागरिक वाहतुकीचे नियमन करताना दिसले.

तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने वाहनालक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. सकाळपासून झाली कोंडी दुपारी दोन वाजता काही अंशी कमी झाली होती.यबाबत सहायक पोलिस निरीक्षक शिल्पा लंबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

या उपाययोजनांची गरज

  • कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम गतीनेपूर्ण करणे.

  • कात्रज चौकातील वादात असलेल्या जागांचे भूसंपादन युद्धपातळीवर करणे.

  • चौक आणि मुख्य रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणे.

  • सातारा रस्त्यावरून स्वारगेटला आणि स्वारगेटवरून सातारामार्गे जाणार्‍या एसटी महामंडळाच्या बस काही काळासाठी नवले पूलमार्गे वळविणे.

  • बहुसंख्य पीएमपी बस कात्रज चौकात न येऊ देता मोरेबाग परिसरातून परत वळविणे.

  • नवले पुलाकडून स्वारगेट परिसरात जाणारी वाहने वंडरसिटी कात्रज डेअरीमार्गे वळविणे.

  • सातारा रस्ता परिसरातून कोंढव्याकडे जाणारी वाहने गुजरवाडी फाट्यावरून वळविणे.

  • सातार्‍याकडून स्वारगेट बाजूला येणारी सर्व वाहने कात्रज चौकात न येऊ देता नवले पूलमार्गे वळविणे.

2024-10-02T08:07:29Z dg43tfdfdgfd