शब्दकळा: दिठी

दृष्टी, नजर याला समानार्थी शब्द आहे ‘दिठी’. मात्र, हा शब्द फार कमी वेळा आपल्या भेटीस येतो. सर्वसाधारणपणे दृष्टी अथवा नजर हेच शब्द वापरले जातात. कविता किंवा ओव्यांमध्ये मात्र हा शब्द आवर्जून वापरलेला आढळतो. ‘दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले’ असे शंकर रामाणी लिहून जातात, तर ‘भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे’ अशी ओळ आरती प्रभू लिहितात. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘तुकारामांची गाथा’ यांतही दिठी हा शब्द आढळतो.

ज्ञानेश्वर माऊली ‘तुमचेया दिठिवेचिया वोले। सासिन्नले प्रसन्नतेचे मळे। ते साऊली देखोनि लोळें। श्रांतु जी मी॥’ असे ‘ज्ञानेश्वरी’च्या नवव्या अध्यायात लिहितात; तर ‘अमृतानुभव’मध्ये ‘दृश्याचिही सृष्टी। दिठी वरी दिठी। उठलिया तळवटी। चिन्मात्राची।।’ असे म्हणतात. तुकाराम महाराजांच्या गाथेतही दिठी हा शब्द अनेकदा येतो. त्याचे हे एक उदाहरण, ‘आता या जीवाचियासाठी। न सुटे पडलिया मिठी। तुका म्हणे सिणलो जगजेठी। न लवी दिठी दुसऱ्याची।।’ ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा यांत वारंवार येणारा दिठी हा शब्द नक्की काय सांगू पाहतो? दृष्टी, नजर हे समानार्थी शब्द त्यांनी का वापरले नसावेत? अगदी शंकर रामाणींनीही ‘दृष्टीच्या दिशा’ असे का लिहिले नसावे? या प्रश्नांचे उत्तर दिठी या शब्दाला असलेल्या अर्थच्छटेत लपले आहे. एकूण उदाहरणे पाहिली, तर दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.

‘दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले...’ ही ओळ वाचली, की तो साक्षात्काराचा क्षण आपल्या दृष्टीपुढे उभा राहतो आणि आत्माराम जागा झाला, हे समजते. दृष्टी किंवा नजर या शब्दाला ती अर्थच्छटा नसल्यानेच, ‘दृष्टीच्या दिशा खोल तेजाळताना’ असे म्हटले नसावे. अनेकदा संतांच्या ओव्या वाचताना लक्षात येते, की येथे दिठीच्या ऐवजी दृष्टी हा शब्द वापरला असता, तरी छंदाच्या दृष्टीने चुकले नसते; परंतु त्यांनी आवर्जून दिठी हाच शब्द वापरलेला दिसतो. एकदा दिठी या शब्दाला असलेला आध्यात्मिक संदर्भ लक्षात आला, की आपल्यापुढची अनेक कोडी सुटतात आणि आपलीही दृष्टी अथवा नजर ‘दिठी’ होऊन जाते!

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-04T07:47:02Z dg43tfdfdgfd