व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग

मुंबईतल्या भायखळा येथील ‘राणीची बाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राणिसंग्रहालयाचे नाव १९६९ मध्ये बदलून व्हिक्टोरिया राणीच्या खुणा पुसण्यात आल्या; ‘जिजामाता उद्यान’ हे नवे नावही रुळले, मात्र या उद्यानात कुठेतरी कडेला का होईना व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आहे पण वीरमाता जिजाबाईंचा पुतळा वा त्यांची प्रतिमाही नाही, अशी स्थिती अगदी १९९५ पर्यंत होती. ही कमतरता दूर करण्याचे १९९५ मध्ये ठरल्यावर, १९९८ मध्ये जिजामाता व बाल-शिवराय यांचे पुतळे असलेले स्मारकशिल्प या उद्यानात मध्यवर्ती ठिकाणी उभारले गेले. चेहऱ्यावर शालीन प्रौढत्व आणि डोळे तसेच हालचालींतून पुत्राला प्रोत्साहन देण्याचा भाव असलेल्या जिजामातांचे हे शिल्प विठ्ठल शानभाग यांनी घडवले होते. या विठ्ठल शानभाग यांचे निधन २५ एप्रिल रोजी झाल्यानंतर आता, त्यांच्या कलेची हीच मोठी खूण त्यांच्या कर्मभूमीत उरली आहे.

मुंबईत सर ज. जी. कला महाविद्यालयाच्या शिल्पकला विभागात विठ्ठल शानभाग शिकले, तोवर १८५७ पासून ‘जेजे’मध्ये सुरू झालेली शिल्पकलेची पद्धत कायम होती. शिल्पे यथातथ्यवादी असोत की अलंकारिक, काटेकोर कामाला पर्याय नाही असे मानणारी ही पद्धत होती. या शिल्पपद्धतीचे नमुने एकोणिसाव्या शतकात घडलेल्या क्रॉफर्ड मार्केटच्या (आता म. फुले मंडई, मुंबई) प्रवेशदारी दिसतात, तसेच त्याचे अधिक भारतीय आणि मोहक रूप ‘जेजे’त शिरल्यावर जी. के. म्हात्रे यांच्या ‘मंदिरपथगामिनी’ या शिल्पातून पाहायला मिळते. पुढे विठ्ठल शानभाग याच संस्थेत शिकवूही लागले, तेव्हा ही अकॅडमिक पद्धत ब्रिटिशांनी रुळवली असली तरी ती जोपासणे हिताचे आहे असा आग्रह ते मांडत. साधारण १९६० च्या दशकात ‘अमूर्त शिल्पकले’चे वारे मुंबईत आणि जेजेतही शिरले होते, दिल्लीत शंखो चौधुरी आणि त्यांच्या शिल्पीचक्र गटातील सहकाऱ्यांनी अमूर्तशिल्प पद्धत आधीच अंगीकारली होती; पण शानभाग सरांनी त्यास विरोध केला. विद्यार्थी म्हणून अकॅडमिक शैलीच शिका, मग हवे ते करा असा सूर लावतच त्यांनी निवृत्ती घेतली. या काळात अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि हे विद्यार्थी आज यथातथ्यवादी शिल्पे करीत नसले तरी, शानभाग सरांकडून खूप शिकायला मिळाल्याचे कबूल करतात!

शानभाग यांनी विलेपार्ले येथे स्टुडिओही थाटला होता. पण तालीम, वाघ, सोनावडेकर, कल्याणचे साठे यांच्याइतका व्याप वाढवणे त्यांना जमले नाही किंवा ते त्यांनी केले नाही. त्यांचे संघटनकौशल्य दिसले ते उतारवयात त्यांचा ओढा अध्यात्माकडे वळल्यावर आणि पाल्र्यातील ‘मद्रासी राम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जीएसबी रामानंजेय देवस्थाना’च्या कार्यकारिणीचे ते प्रमुख झाल्यावर. या मंदिराच्या दीपोत्सवाला त्यांनी दिलेले देखणेपणही त्यांची आठवण देत राहील.

2024-04-28T22:48:49Z dg43tfdfdgfd