मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून २८ झाडांचे पुनर्रोपण

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाच्या स्थानकांसाठी तोडलेल्या झाडांपैकी २८ झाडांचे चर्चगेट स्थानकाबाहेर पुनर्रोपण करण्यात आले आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाच्या स्थानकांसाठी तोडलेल्या २५७ झाडांपैकी ११९ झाडांचेच पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठेवला आहे. झाडांच्या पुनर्रोपण आणि जिओ टॅगिंग प्रक्रियेचा अहवाल देखील विशेष समितीसमोर सादर केला. अहवालानुसार, एमएमआरसीएलने ग्रॅंट रोड स्थानक परिसरात आवश्यक असलेल्या ५१ झाडांपैकी २१ झाडे, सांताक्रूझ स्थानक परिसरात आवश्यक ९६ मोठ्या झाडांपैकी ४२, एमआयडीसी स्थानक परिसरात आवश्यक १९ पैकी १५ आणि गिरगाव येथे १९ पैकी १५ झाडे लावण्याचा प्रस्ताव दिला आहे.

हेही वाचा – जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, मुंबईत विविध ठिकाणी १० ते २० टक्के कपात

हेही वाचा – मुंबई : आईसक्रीमचे आमीष दाखवून ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण व विनयभंग, आरोपीला अटक

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पातील स्थानकांच्या बांधकामासाठी तोडण्यात आलेल्या झाडांचे त्याच जागी पुनर्रोपण करण्याची हमी एमएमआरसीएल न्यायालयाला दिली होती. या प्रकरणी देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने द्विसदस्यीय समिती स्थापन केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी झाडांचे पुनर्रोपण सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी समितीला दिले.

2024-05-06T14:49:02Z dg43tfdfdgfd