भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्लाप्रकरणी एकाला अटक

पीटीआय, लंडन

ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर मार्च २०२३मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एका व्यक्तीला भारतामध्ये अटक केली. इंदरपाल सिंग गाबा असे त्याचे नाव आहे. तो स्वत:ला खलिस्तानी अतिरेकी भिंद्रनवालेचा अनुयायी असल्याचे सांगतो आणि त्याच्या विचारांचे अनुसरण करतो.उच्चायुक्तावर झालेल्या हल्ल्याच्या तपासाचा भाग म्हणून गाबाला अटक करण्यात आली आहे. तो पश्चिम लंडनचा रहिवासी आहे. त्याला गेल्या वर्षी अट्टारी सीमेवर पाकिस्तानातून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतानाही ताब्यात घेण्यात आले होते.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एनआयए’ने गाबाला यूएपीएचे कलम १३(१), राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियमचे कलम २ आणि भारतीय दंड संहितेचे कलम ३४ अशा विविध कलमांखाली अटक केली आहे. लंडनमध्ये गेल्या वर्षी १९ मार्च आणि २२ मार्च या दोन दिवशी इंडिया हाऊससमोर हिंसक निदर्शने करण्यात आली होती. ‘एनआयए’ने नोंदवलेल्या अहवालानुसार, १९ मार्चला निदर्शकांच्या एका मोठय़ा गटाने भारतीय अधिकाऱ्यांवर हल्ला केला, भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीचे नुकसान केले आणि भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला. २२ मार्चला त्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या, भारताच्या राष्ट्रध्वजाचा पुन्हा अपमान केला आणि बेकायदेशीर व धमकावणाऱ्या कृत्यांमध्ये सहभागी झाले. या घटनांचा तपास करताना ‘एनआय’ने पंजाब, राजस्थानात शोध कारवाई केली होती.

2024-04-26T23:26:02Z dg43tfdfdgfd