“बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं तरी ते…”, इंडिया आघाडीच्या आरक्षणावरील आरोपांना पंतप्रधान मोदींचं उत्तर

देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत असून दोन टप्प्यांमधील मतदान पार पडलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर ७ मे रोजी मतदान पार पडेल. त्यामुळे सर्व पक्षांनी सध्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काल कोल्हापुरात तर आज सोलापूर, सातारा आणि पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. सोलापूरमधील भाजपा उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ सोलापुरात घेतलेल्या सभेत मोदी यांनी आरक्षणावर भूमिका मांडली.

देशभरातील विरोधी पक्ष सातत्याने भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत की मोदी पुन्हा सत्तेवर आले तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकांचं आरक्षण काढून घेतील. भाजपाला संविधानात त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घेण्यासाठी लोकसभेच्या ४०० जागा जिंकायच्या आहेत. असे आरोप विरोथकांकडून होत आहेत. या आरोपांना मोदी यांनी सोलापूरच्या सभेतून उत्तर दिलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील (ओबीसी) लोकांशी विश्वासघात केला आहे. त्यामुळे या समाजातील लोकांचा आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. ते आता काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला कंटाळले आहेत. त्यामुळेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले लोक थोडेसे गडबडले आहेत, गोंधळले आहेत. त्यातून ते लोक आता खोट्या अफवा पसरवू लागले आहेत. ते आता म्हणत आहेत की आम्ही (भाजपा) संविधान बदलू, आम्ही आरक्षण संपवू. काँग्रेसवाले अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. परंतु मी याआधी देखील सांगितलं आहे की आज स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी वाटलं तर तेसुद्धा आपल्या देशातलं आरक्षण संपवू शकत नाहीत, त्यामुळे मोदींचा तर प्रश्नच येत नाही.

2024-04-29T15:06:42Z dg43tfdfdgfd