पालघरची जागा भाजपकडे ?

गेल्या काही आठवड्यांपासून जागा वाटपावरून चर्चेत असलेली पालघरची जागा भाजपाच्या वाटेला जातं असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघासाठी आग्रह धरल्याने भाजपने पालघरवर दावा केल्याचे विश्वसनीय वृत्त असून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी द्यावयाची असल्यास त्यांना पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करावा लागेल अशी चिन्ह आहेत.

मतदार संघाच्या पुनरचनेनंतर सन २००९, २०१४ व २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पालघरची जागा भाजपाने लढून २०१४ व २०१८ मध्ये विजय संपादन केला होता. मात्र सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपामध्ये पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने आग्रह धरल्याने ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले राजेंद्र गावित यांना भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवण्याची सूचना केली होती.

हेही वाचा : बरेलीच्या बालेकिल्ल्यात भाजपाने बदलला उमेदवार; काय आहे पडद्यामागचा खेळ?

सद्यस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात असणारे राजेंद्र गावित हे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असले तरीही राज्यातील अन्य चार-पाच जागांसह पालघरच्या जागे संदर्भातील निर्णय प्रलंबित राहिला होता. विशेष म्हणजे महायुती मधील दोन्ही पक्षांनी पालघरच्या जागेवर दावा सांगत मोर्चेबांधणी सुरू केली होती.

एकीकडे ठाण्याची जागा शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना पालघरची जागा भाजपाकडे वळतानाचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये ठाण मांडून बसलेले पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी २५ एप्रिल अचानकपणे कार्यकर्त्यांची बैठक मनोर येथे घेतली होती. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांची मनसुबे उंचावले होते. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता आल्याचे सांगण्यात येते.

भाजपाकडे पक्षांमधील डॉ. हेमंत सवरा, संतोष जनाठे, माजी आमदार विलास तरे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार असून विद्यमान खासदारांना या जागेवरून निवडणूक लढवायची असल्यास त्याला पुन्हा भाजपा पक्षप्रवेश करावा लागणार आहे. मात्र भाजपा मित्र पक्षातून जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वनगा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण किंवा अन्य उमेदवारांच्या आयात करण्यासाठी देखील प्रयत्नशील असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात घेतला जाईल असे खात्रीला एक सूत्रांकडून सांगण्यात येते.

हेही वाचा : ऐन निवडणुकीत दिल्ली काँग्रेसमध्ये गोंधळ, कोणत्या कारणाने अरविंदर सिंह लवली यांनी राजीनामा दिला?

भाजपाच्या कोर कमिटीच्या सदस्यांकडून उमेदवारां बद्दलची पसंती खाजगीत विचारण्यात आल्याची माहिती पुढे आली असून गेले काही महिने बॅकफूटवर असणारे भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

भाजपाने निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू केली आहे. पालघर ची जागा भाजपाला सोडल्यास ही जागा भाजपा स्वतः लढवणार की बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार याबाबत देखील सध्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : “काँग्रेसमध्ये नातेवाईकांना तिकीट, कार्यकर्त्याला किंमत नाही”; माजी मुख्यमंत्र्याची टीका

विद्यमान खासदारांना भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध

पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद जास्ती असल्याचे वक्तव्य भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी महिनाभरापूर्वी प्रसार माध्यमांसमोर केली होती. त्यानंतर महायुती मधील दोन्ही पक्षांमध्ये जिल्ह्यातील ताकदीबद्दल वेगवेगळी वक्तव्य व दावे प्रति दावे करण्यात येत होते. रवींद्र चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या बैठकीत भाजपाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यां कडून विद्यमान खासदारांच्या उमेदवारीबाबत तीव्र नाराजीचा सूर उमटल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे भाजपा विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देतात किंवा इतर उमेदवाराची निवड करतात याबद्दल उत्सुकता आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३ मे रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने पुढील दोन दिवसात पालघर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

2024-04-29T09:35:38Z dg43tfdfdgfd