दुर्बोधतेची बेसरबिंदी

प्रमोद मुनघाटे : जिवंतपणीच एखादा कवी दंतकथा ठरावा, हे मराठीत फक्त ‘ग्रेस’ यांच्या संदर्भात घडले आहे. कवी माणिक गोडघाटे यांच्या ‘ग्रेस’ टोपणनावाची कहाणी विलक्षण आहे. १९६७ मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने ‘नवे कवी नवी कविता’ या मालेत नव्या पाच कवींचे कविता संग्रह प्रसिद्ध केले. त्यातील पहिला संग्रह म्हणजे, ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’. त्यांच्यासह ना. धों. महानोर, अनुराधा पोतदार, शंकर वैद्य आणि वसंत सावंत या कवींचेही संग्रह प्रसिद्ध झाले. कवीचे ग्रेस हे नाव, पहिल्या पानावर कवीच्या हस्ताक्षरातील कवितेच्या ओळी आणि कविता संग्रहाची अर्पण पत्रिका, हे सगळेच मराठी काव्यजगताला नवे होते. ‘To Ingrid Bergman…’ अशी ग्रेस यांची त्यांच्या हस्ताक्षरातील अर्पणपत्रिका होती. अर्पणपत्रिकेची कहाणी इथेच संपत नाही. त्यासाठी आणखी मागे जावे लागते. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांचा काव्यप्रवास सुरू झाला. मूळची स्वीडिश असलेली इन्ग्रिड बर्गमन ही प्रसिद्ध पाश्चात्य सिनेअभिनेत्री. ग्रेस एकदा तिचा ‘दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस’ हा सिनेमा पाहत होते. सिनेमात ‘शी इज इन ग्रेस’ असे तिच्यासंबंधीचे एक वाक्य ऐकताना ‘इन्ग्रिडने आपल्याला शीळ घातली आणि त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली’ असा साक्षात्कार ग्रेस यांना होतो. मग पुढे ग्रेस यांच्या वतीने पॉप्युलरचे संचालक रामदास भटकळ इन्ग्रिड बर्गमनला एका नाटकाच्या प्रयोगाच्या प्रसंगी लंडनमध्ये भेटतात. तिला ग्रेसचा साक्षात्कार सांगतात. इन्ग्रिड ग्रेससाठी आपला एक फोटो स्वाक्षरी करून भटकळांजवळ देते. म्हणून तिच्या ऋणात राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव स्वीकारले, असे एका मुलाखतीत ते सांगतात. इथे ही कहाणी पूर्ण होते.

‘संध्याकाळच्या कविता ‘शिवाय ग्रेस यांचे ‘राजपुत्र आणि डार्लिंग’ (१९७४), ‘चंद्रमाधावीचे प्रदेश’ (१९७७), ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ (१९९५), ‘सांजभयाच्या साजणी’ (२००६) आणि ‘बाई! जोगियापुरुष’ (२०१३) हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पॉप्युलरनेच ग्रेस यांच्या सर्व कविता आणि ललितबंधांचे संग्रह प्रकाशित केले आहेत.

‘संध्याकाळच्या कविता’ मध्ये ग्रेस यांचा जो शोकात्म सूर दिसतो, तोच सूर त्यांच्या संपूर्ण काव्यविश्वाला व्यापून उरलेला दिसतो. ते म्हणतात,

क्षितिज असे दिसते,

तशी म्हणावी गाणी

देहावरची त्वचा आंधळी

छिलून घ्यावी कोणी.

गाय जशी हंबरते,

तसेच व्याकुळ व्हावे

बुडता बुडता सांजप्रवाही

अलगद भरुनी यावे.

संध्याकाळ आणि ग्रेस यांचे हे नाते काहीसे शोकात्म आणि गूढ आहे. तिन्हीसांजेची हृदय पिळवटून टाकणारी व्याकुळता त्यांच्या समग्र कवितेच्या अनुभवविश्वाचे केंद्र आहे. या व्याकुळतेचे उगमस्थान ग्रेस यांच्या अस्तित्वाला व्यापून उरलेल्या दुःखात आहे. पहिल्या संग्रहापासूनच त्यांच्या दुःखाचा आकांत त्यांच्या पुढील कवितांमध्ये चढत्या क्रमाने दिसतो. ग्रेस यांच्या मते आकांत हे कलाकृतीचे एक मौलिक मूल्य असते. रामायण-महाभारतातील प्राचीन स्त्रियांचे असो की आना कॅरेनिनासारखी अभिजात नायिका असो किंवा व्हिन्सेंट वॉन गॉगसारख्या कलावंताचे दुःख असो, या सगळ्यांच्या आकांताने ग्रेस यांच्या व्यक्तित्वाचे अणुरेणू अखंड जळत राहतात. त्यातून मग नक्षत्रांनी खच्चून भरलेल्या रात्रीच्या आभाळासारखी त्यांची कविता प्रतिमांच्या भारांनी ओथंबून जाते. लौकिक-अलौकिकाच्या सीमारेषेवर हिंदकळणारी ही हळवी भावावस्था ग्रेस यांच्या अनवट शब्दांनी वाचकांना सौंदर्याचा साक्षात्कार घडवते. म्हणून ग्रेस यांची कविता ही शुद्ध भावकविता आहे, असे म्हटले जाते. त्यांच्या कवितेचा पिंडच रोमँटिसिझमचा आहे. आपल्या कवितेबद्दल ते स्वतःच सांगतात,

मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल

दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल...

ग्रेस यांच्या निर्मितीची तऱ्हा आणि परिणाम अशी मंत्रासारखी आहे. आधुनिक मराठी कविता जेव्हा नवता आणि विद्रोहाच्या तत्त्वांनी भारित झाली होती, तेव्हा ग्रेस यांची कविता वृत्त-छंदाची पैंजणे लेवून अवतरली होती. तालबद्ध पावले टाकत पुढे आली. पण या कवितेच्या नाकात जन्मत:च दुर्बोधतेची बेसरबिंदीही आहे. मराठीतील रोमँटिक काव्याच्या या अद्भुत शिल्पाभोवती गूढ धुके आहे. परिणामी या कवितेने बराच काळ मराठी समीक्षेला दूर अंतरावर ठेवले आणि चकविले, पण आदिम अंधाऱ्या गुहेतील अमानवी आवाजासारखी ग्रेस यांची कविता आजही वाचकांना भुरळ घालते आणि खेचून घेते.

[email protected]

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T10:51:26Z dg43tfdfdgfd