जन्मकहाणी लक्षद्वीप प्रवाळांची

- मयुरेश गांगल

सुमारे सहा-साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड आशियाच्या दिशेने प्रवास करत होता. त्या वेळी समुद्रात जे ज्वालामुखीचे उद्रेक झाले, त्यातून लक्षद्वीप बेटांचा जन्म झाला. त्या वेळी ही बेटे म्हणजे ज्वालामुखीमुळे समुद्रातून बाहेर आलेले पर्वत होते. या पर्वताचा जो भाग समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाजवळ होता, त्याच्या आधाराने उथळ पाण्यात प्रवाळांची वस्ती झाली.

आपण ज्याला प्रवाळ भिंती किंवा कोरल रिफ म्हणतो, ती वस्तुतः अब्जावधी चिमुकल्या प्रवाळ जिवांची वसाहत असते. हे प्रवाळ प्राणी उथळ पाण्यात दगडासारख्या कठीण भागाच्या आधारे स्थिरावतात आणि स्वतःभोवती स्वसंरक्षणासाठी चुनखडकाचा सांगाडा बनवतात. असे हजारो प्राणी एकमेकांचा आधाराने उभे राहिले की, प्रवाळ तयार होते आणि अशा हजारो-लाखो प्रवाळांच्या मिळून प्रवाळ भिंती तयार होतात. या प्रवाळ जिवांच्या शरीरांमध्ये सूक्ष्म वनस्पती राहतात.

प्रवाळांच्या शरीरात राहिल्यामुळे सूक्ष्म वनस्पतींना घर मिळते आणि चुनखडकाच्या सांगाड्याचे संरक्षण मिळते. या सूक्ष्म वनस्पती उथळ पाण्यात प्रकाश प्रकाशसंश्लेषण करून स्वतःसाठी आणि प्रवाळ जिवांसाठी अन्न तयार करतात. म्हणून या प्रवाळ भिंती उथळ पाण्यामध्येच आढळतात.

लक्षद्वीपचे ज्वालामुखी कालांतराने थंड झाले आणि लाटा आणि वाऱ्यामुळे धूप होत असल्याने हळुहळू पाण्याखाली खचू लागले. त्यामुळे त्यांच्या दगडी पृष्ठभागावर वाढणारे प्रवाळ हळुहळू खोल पाण्यात जाऊ लागले, जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. अशा वेळी नव्या प्रवाळ जिवांनी दगडाच्या आधाराअभावी जुन्या मृत प्रवाळांच्या चुनखडीच्या सांगाड्यांचा आधार घेऊन त्यावर वाढायला सुरुवात केली आणि पाण्याच्या पृष्ठभागाच्या दिशेने वाढ चालू ठेवली. या प्रक्रियेमुळे कालांतराने जिथे पूर्वी ज्वालामुखी होता, तिथे आता पाण्याच्या पृष्ठभागालगत चुनखडकाचे आणि प्रवाळांचे जिवंत रिंगण तयार झाले. काही वेळा मृत प्रवाळ जिवांचे सांगाडे तुटतात. असे तुकडे या जिवंत रिंगणात साठत गेले आणि रिंगणाच्या आतमध्ये उथळ पाण्याचा लगून आणि या चुनखडीच्या तुकड्याच्या ढिगाची बेटे तयार झाली. अशा प्रकारे आजची लक्षद्वीप बेटे उदयास आली. बेटांभोवती असलेल्या जिवंत प्रवाळांच्या रिंगणामुळे या बेटांचे वादळ, वारे, समुद्राच्या मोठ्या लाटा यांपासून रक्षण करते. त्यामुळे बेटांवर जीवसृष्टी आणि मनुष्यवस्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. (पूर्वार्ध)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-01T07:10:10Z dg43tfdfdgfd