चीनचे नवे उड्डाण

जगातील प्रथम क्रमांकाची महासत्ता व्हायची चीनची आकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यासाठी प्रत्येक आघाडीवर यश मिळविण्याचे जीवतोड प्रयत्न तो देश करीत असतो. सध्या चीनने अंतराळ क्षेत्रात नवी भरारी घेण्यात यश मिळविले असून, तीन अंतराळवीरांना ‘तियानगाँग’ या नव्या अंतराळ स्थानकात पाठविले आहे. विशेष म्हणजे, या तिघांत एका सर्वसामान्य नागरिकाचा समावेश आहे.

बीजिंगच्या बेइहांग विद्यापीठातील प्रा. गुई हाइचाओ यांच्या रूपाने चीनने प्रथमच सामान्य नागरिकाला अवकाशात पाठवले आहे. अन्य अंतराळवीरांमध्ये मोहिमेचे कमांडर जिंग हेपेंग यांचा समावेश असून, ते चौथ्यांदा अंतराळात जाणारे पहिले चिनी अंतराळवीर ठरले आहेत. अंतराळवीर झू यांगझू यांचे हे पहिलेच उड्डाण ठरले आहे. मंगळवारी चीनच्या ‘शेंझॉऊ १६’ या अवकाशयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले, तेव्हा अमेरिकेसोबत सुरू असलेल्या छुप्या अंतराळ स्पर्धेत चीनने एक पाऊल पुढे टाकले. अमेरिकेच्या ‘नासा’शी जोरदार स्पर्धा करणाऱ्या चीनने अंतराळ मोहिमांचा वेग वाढवला असून, २०३०पूर्वी चंद्रावर मानवी मोहिमा राबविण्याची त्या देशाची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

‘चायना मॅन्ड स्पेस एजन्सी’ने (सीएमएसए) दिलेल्या माहितीनुसार, गोबीच्या वाळवंटाशेजारील ‘जियुक्वान’ या प्रक्षेपण स्थळावरून मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘शेंझॉऊ १६’ने ‘लाँग मार्च दोन एफ’ या रॉकेटच्या मदतीने उड्डाण केले. या मोहिमेतले तीन अंतराळवीर यापूर्वी ‘शेंझॉऊ १५’ या यानाद्वारे धाडण्यात आलेल्या अंतराळवीरांची जागा घेतील. हे यान गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेर अंतराळ स्थानकात पोहोचले होते. सध्या तेथे असणाऱ्या अंतराळवीरांनी सहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला असून, नवे अंतराळवीर तेथे पोहोचताच त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. चीनच्या ‘तियानगाँग’ या अंतराळ स्थानकात तीन मॉड्युल्सचा समावेश आहे. या अंतराळ स्थानकाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०३०पर्यंत चंद्रावर विशेष मोहीम आयोजित करण्याव्यतिरिक्त सध्याच्या मोहिमेचा विस्तार करण्याची योजना आहे.

चीनने १९७०मध्ये पहिला उपग्रह प्रक्षेपित केला, तर २००३मध्ये पहिला चिनी अंतराळवीर अवकाशात पोचला. त्यानंतर मात्र अवकाश संशोधन कार्यक्रमात चीनने मोठी आघाडी घेतली असून, चंद्रावर माणूस उतरविण्याचे चीनचे स्वप्न सात-आठ वर्षांत प्रत्यक्षात येईल, अशी चिन्हे आहेत.

2023-06-01T04:16:01Z dg43tfdfdgfd