अग्रलेख: घंटागाडी बरी…

सद्या:स्थितीत आपल्यासमोरची आव्हाने काय आहेत, याचे भान राज्यातील राजकारण्यांस असल्याच्या खुणा शोधूनही सापडणार नाहीत.

दशकभराच्या संसारानंतर घटस्फोटित पती-पत्नींचे एकमेकांविषयी अद्वातद्वा बोलणे आणि महाराष्ट्रातील राजकीय भाषणबाजी यांत तूर्त काहीही फरक नाही. प्रेमात पडण्याच्या तरल काळात एकमेकांसाठी सूर्यचंद्र तोडून आणण्याची भाषा करणारे घटस्फोटानंतर एकमेकांची किरकोळ उणीदुणीही काढू लागतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे झाले आहे. आपण कोणत्या काळात आहोत, आपल्यासमोरची आव्हाने काय, आपणास स्पर्धा कोणत्या प्रांतांशी करावयाची आहे, त्यासाठी काय करावे लागेल, आपले प्रतिस्पर्धी किती तगडे आहेत… अशा कोणत्याही म्हणून मुद्द्यांचे भान राज्यातील राजकारण्यांस असल्याच्या खुणा शोधूनही सापडणार नाहीत. हे सर्व रमले आहेत त्यांच्या त्यांच्या भूतकाळात! कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि कोणी कोणास दगा दिला हे मुद्दे चिवडण्यातच मंडळींना रस. राज्यातील जनतेस यात काडीचाही रस नाही. तेव्हाही या मंडळींनी जे काही केले ते स्वत:स सत्ता मिळावी यासाठी आणि आताही त्यांचा खटाटोप सुरू आहे तो सर्व सत्तेची छत्रचामरे आपल्याच भोवती कशी झुलत राहतील यासाठीच. महाराष्ट्रनामे देशातील सर्वात प्रगत, सर्वात श्रीमंत राज्याचे काय होणार, ही सुबत्ता तशीच राहावी यासाठी आपण काय करणार, या राज्यात स्पर्धा परीक्षांतील गोंधळ आणि उद्याोगांच्या मंदावलेल्या गतीने तरुण पिढीसमोर उभे ठाकलेले मोठे गंभीर आव्हान इत्यादी एकही मुद्दा निवडणूक लढणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे असे प्रचाराचा स्तर पाहून तरी वाटत नाही. जे काही सुरू आहे ते शिसारी आणणारे आहे. सबब काही खडे बोल सुनावणे आवश्यक.

त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून करावी लागेल. मुख्यमंत्रीपदाचा पोच आपणास आहे असे जाणवू देण्याइतपत शिंदे यांचे अलीकडेपर्यंतचे वर्तन होते. निवडणुकांचा प्रचार तापल्यावर आणि हवेतील उष्णता वाढल्यावर त्यांचा हा पाचपोच वितळताना दिसतो. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे नाते काय होते आणि काय झाले वगैरे चिखल तुडवण्यात ते आणि त्यांचे समर्थक सोडले तर कोणालाही रस असण्याचे कारण नाही. हा गाळ उपसण्यात मुख्यमंत्र्यांनी वेळ दवडावा? ठाकरे कुटुंबीय शिंदेंवर इतका अन्याय करत होते आणि इतकी अपमानास्पद वागणूक देत होते तर शिंदे मुळात ‘त्या’ शिवसेनेत इतके दिवस तरी राहिलेच का? इतकेच नव्हे तर अशा अकार्यक्षम, स्वार्थी इत्यादी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांनी मंत्रीपदही सुखाने ‘भोगले’, ते का आणि कसे? दुसरे असे की दिल्लीतून कोणी ‘महाशक्ती’ पाठीशी उभी राहीपर्यंत आपल्यावरील अन्यायाची जाणीव शिंदे यांना कशी काय झाली नाही? दुसऱ्या बाजूने असेच काही प्रश्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उर्वरित सेनेस विचारता येतील. मुळात प्रचंड अधिकार असलेले मुख्यमंत्रीपद हाती असतानाही आपल्या तुकडीतील बिनीचे शिलेदार प्रतिस्पर्ध्यास फितूर आहेत हे मुख्यमंत्र्यांस कळू नये? संध्याकाळी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडून गेलेला उठतो आणि थेट सुरतेच्या वाटेला लागतो आणि याचा सुगावा सत्ताधीशांस लागू नये? आता हे इतक्या वर्षांचे ठाकरे यांचे साथीदार अचानक ‘गद्दार’ ठरतात, हे कसे?

समोरच्या बाजूस तर यापेक्षाही कहर! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना अत्यंत भ्रष्ट वगैरे तर आहेच; पण काही कामाचीही नाही. हे खरे असेल तर २०१४ ते २०१९ या सेनेचे जू मानेवरून उतरावे यासाठी फडणवीस यांनी काय केले? नाणार ते वाढवण अशा सर्व प्रकल्पांना सेनेचा सत्तेत असूनही विरोध होता. तो फडणवीस यांनी का सहन केला? सरकारला पाठिंबा देणाऱ्या डाव्यांवर सत्ता अवलंबून होती तरी सत्तेची फिकीर न बाळगता मनमोहन सिंग यांनी अणुकरार रेटण्याची हिंमत दाखवली. फडणवीस यांनी असा काही ठामपणा दाखवला काय? उलट मुंबईतील महापौर बंगल्यासारखी महत्त्वाची वास्तू फडणवीस यांनी आनंदाने सेनेच्या हाती दिली. त्या वेळी सेनेचे वास्तव फडणवीस आणि त्यांच्या पक्षास कळले नाही? त्याही आधीपासून, म्हणजे फडणवीस यांचा उदय होण्याच्या आधीपासून, भाजप आणि सेनेची युती आहे. मग प्रश्न असा की कार्यक्षम, अभ्रष्ट इत्यादी भाजपने मग अकार्यक्षम, भ्रष्ट इत्यादी सेनेचे ओझे इतका काळ वागवलेच का? कोणासाठी? आणि २०१९ साली सेनेने साथ सोडली नसती तर हा पक्ष भाजपसाठी इतका वाईट ठरला असता का?

फडणवीस यांचे सहउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत तर हसावे की रडावे हा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाही पडतो. अजितदादा सध्या काकांच्या नावे कडाकडा बोटे मोडताना दिसतात. पण त्यांच्या अंगचे कर्तृत्व जगास दिसण्याआधी याच काकांच्या पुण्याईवर अजितदादांस हवे ते मिळत गेले. तेव्हा ‘‘काका… माझ्याऐवजी हे पद आर. आर. आबा वा जयंत पाटील वा दिलीप वळसे पाटील वा जितेंद्र आव्हाड यांस द्या’’, असे काही दातृत्व अजितदादांनी दाखवले होते किंवा काय, याचा तपशील उपलब्ध नाही. असल्यास तो जरूर द्यावा. इतिहासात त्याची नोंद होईल. सत्तेशिवाय विकास नाही, असा काही चमत्कारिक युक्तिवाद दादा करतात. याचा अर्थ सत्ता कोणाचीही असो, आपण सत्ताधीशांच्या वळचणीखाली असणारच असणार, असाच याचा अर्थ नव्हे काय? आणि त्यांनाही दिल्लीची ‘महाशक्ती’ पाठीशी उभी राहीपर्यंत काकांकडून होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली नाही, हेही नवलच म्हणायचे. खरे तर अजितदादांनी थोडासा वेळ काढून आपले नवे सहकारी राज ठाकरे यांच्याकडून काही गुण जरूर घ्यावेत. राज हे चुलतभावाशी संबंध बिघडल्यामुळे काकाविरोधात गेले आणि अजितदादा चुलत बहिणीमुळे. पण राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याची धडाडी दाखवली आणि ज्याच्यामुळे आपले राजकीय व्यक्तिमत्त्व तयार झाले त्या आपल्या काकांस कधी बोल लावला नाही. याउलट अजितदादा! असो. पण अजित पवारांच्या बंडाचा एक(च) फायदा म्हणजे सुप्रिया सुळे यापुढे तरी ‘दादा… दादा’ करत राजकारणाची राखी पौर्णिमा करणार नाहीत.

हे सर्व पाहिल्यावर जाणवते ते हेच की सद्या:स्थितीत सर्व पक्षांस रस आहे तो एकमेकांचे नाक कापण्यात. या खेळात आपण सर्वच नकटे होऊच, पण महाराष्ट्रासही धाकटे करू याची जाणीव त्यांना नाही. सद्या:स्थितीत राज्यास किती प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागते आहे, याची जाणीव असल्याचे या सर्वांच्या राजकारणातून तरी दिसत नाही. सर्व दक्षिणेकडील राज्ये कमालीच्या वेगाने प्रगती साधत आहेत. केंद्राच्या नाकावर टिच्चून त्यांची ही घोडदौड सुरू आहे. शेजारील गुजरातला तूर्त काही कष्ट करायची गरज नाही. त्या राज्याच्या ताटात केंद्राकडून आयते गोडधोड पडत राहणार आहे. यामुळे उलट महाराष्ट्रास विकासासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. पूर्णपणे विकासकेंद्री दक्षिणी राज्ये आणि केंद्राचा कृपाप्रसाद असलेले गुजरात हे महाराष्ट्राचे मोठे आव्हानवीर. जोडीला अवर्षण आणि अवकाळी हे एकत्र संकट आहेच. या आव्हानांचे प्रतिबिंब विद्यामान राजकीय स्पर्धेत नाही, असे खेदाने म्हणावे लागते.

हे सर्व राजकीय पक्ष आणि नेते विविध आकारांच्या रथांतून प्रचार करतात आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते. पण या रथातून केली जाणारी भाषणे पाहता त्यापेक्षा शहरांत सकाळी फिरणाऱ्या घंटागाड्या नागरिकांस अधिक स्वागतार्ह वाटतील. त्या निदान अस्वच्छता कमी करतात. राजकीय रथांबाबत असे म्हणता येणार नाही.

2024-04-23T23:44:28Z dg43tfdfdgfd