Thailand Bus Fire: थायलंडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, ४४ विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. यामध्ये २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यापेक्षाही अधिक मृत्यू झाले असल्याचीही साशंकता व्यक्त केली जात आहे. थायलंडच्या खु खॉट शहराजवळ असलेल्या झीर रंग्सीत मॉलनजीक मार्गावर सदर बसला अचानक आग लागली. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता ही घटना घडल्याचे समोर येत आहे.
बँकॉकमधील उथाई थानी येथील एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक या बसमधून सहलीसाठी जात होते. शाळेपासून २५० किमी अंतरावरील राजधानी बँकॉकमध्ये ही सहल जात असल्याचे सांगतिले जात आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले. मात्र पोलिसांनी अद्याप मृतांचा निश्चित आकडे दिलेला नाही. १६ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना आतापर्यंत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री सुर्या जुआंगरूंगरुंगकित म्हणाले की, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु पोलिसांचा तपास सुरू आहे. थायलंडचे पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनावात्रा यांनी मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, असे सांगितले आहे.
थायलंडचे गृहमंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी सांगितले की, बचाव पथक जेव्हा बस जवळ पोहोचले तेव्हा बसमधून आगीचे लोळ उठले होते. बसच्या आत जाणेही कठीण होऊ बसले होते. यामुळे बसमध्ये बराच काळ अनेकांचे शव बसून होते. ज्यांचा मृत्यू झाला, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
2024-10-01T10:55:08Z dg43tfdfdgfd