ROHIDAS PATIL PASSED AWAY: निष्ठेचा पाईक

विशाल खान्देशच्या विकासाचे स्वप्न पाहून त्याच्या पूर्तीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणून दिल्लीच्या तख्तालाही धडका देण्याची हिंमत दाखविणारे रोहिदास दाजी पाटील यांना नियतीला काही चुकविता आले नाही. वयाच्या ८४ व्या वर्षी धुळे या कर्मभूमीत त्यांनी देह ठेवला, तेव्हा अनेकांना खान्देशातील काँग्रेसचा अखेरचा दुवा निखळल्याचे दु:ख झाले.

स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार चुडामण आनंदा पाटील यांचा वारसा समर्थपणे चालविताना दाजींनी काँग्रेसशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सध्या आमदार कुणाल पाटील यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे. पंडित नेहरू ते राहुल गांधींपर्यंत पाटील घराणे नेहरू-गांधी कुटुंबाशी सदैव एकनिष्ठ राहिले. भारत यात्रेत धुळ्यात असताना राहुल गांधी यांना रोहिदास दाजींची प्रकृती ठीक नसल्याचे कळताच त्यांनी थेट त्यांच्या घरी धाव घेतली तेव्हा हा संबंध पिढ्यानपिढ्या टिकविण्याची अशी दुहेरी असोशीही दिसली. जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली दाजींची कारकीर्द मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीपर्यंत गेली. शंकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असली तरी शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख आदींच्या मंत्रिमंडळातही त्यांना हमखास स्थान असायचे. पक्षातील सर्व गटातटांशी उत्तम स्नेह ठेवताना त्यांनी तडजोडीला मात्र फाटा दिला. यांत्रिकी अभियंता झाल्यानंतर व्यवसाय सुरू केला; पण घराण्याचा राजकीय वारसा त्यांना आपसूक समाजकारणात ओढून घेऊन गेला.

युवक चळवळीत काम करतानाच ते ७८ साली पहिल्यांदा आमदार झाले. ते २२ वर्षे मंत्री राहिले. धुळ्यासाठी संजीवनी ठरणाऱ्या अक्कलपाडा सिंचन प्रकल्पाचे ते जनक. धडाकेबाज निर्णय ही त्यांची ओळख. अनेक संस्थांच्या कार्यात त्यांच्या नेतृत्वाचा अमीट ठसा उमटला. खान्देश विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी ते अखेरपर्यंत आग्रही राहिले. खान्देशातील युवकांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी, वैद्यकीयसह इतर विद्याशाखांमधील शिक्षणाची सुविधाही उपलब्ध केल्या. आजच्या अस्थिर, अनिश्चित राजकारणात निष्ठेचा मापदंड म्हणून त्यांची स्मृती कायम राहील. रोहिदास दाजींना आदरांजली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-10-02T07:00:52Z dg43tfdfdgfd