FERRUGINOUS HAWK: अधिवासाशी अनुकूलन

-सुजाता बाबर

फेरुजिनस हॉक्स ही बहिरी ससाण्याची एक प्रजाती आहे. हे पक्षी कॅलिफोर्नियामध्ये हिवाळा घालवण्यासाठी येत असतात. अलिकडे त्यांची संख्या वाढत आहे. गवताळ प्रदेश हा त्यांचा आवडता अधिवास २० वर्षांपासून कमी होत आहे. त्यामुळे येथील इतर पक्षी प्रजाती कमी होत चालल्या आहेत. परंतु बहिरी ससाण्यांची संख्या मात्र वाढत आहे. याचा अर्थ ते या वातावरणाशी अनुकूलन करत आहेत. विशेष म्हणजे, हा अभ्यास नागरी शास्त्रज्ञांनी केलेला आहे.

सामान्यतः पक्ष्यांचा अभ्यास करताना, विणीच्या हंगामाच्या तुलनेत त्यांच्या इतर वार्षिक चक्राकडे कमी लक्ष दिले जाते. प्रत्यक्षात याच काळात त्यांच्या आरोग्यावर अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे पक्ष्यांच्या अधिवासाचा ऱ्हास. फेरुजिनस हॉकचा अभ्यास करणे आव्हानात्मक आहे, कारण स्थलांतराच्या जागेवर त्यांची संख्या ठळकपणे दिसत नाही. या प्रजातीच्या संख्येबाबतही अनेकदा परस्परविरोधी नोंदी असतात. संवर्धनाची स्थितीदेखील राज्ये, प्रदेश आणि अगदी देशांमध्ये बदलते. कॅलिफोर्नियामध्ये हिवाळ्यातील अनेक ससाणे वॉशिंग्टन किंवा ओरेगॉनमध्ये प्रजनन करतात आणि तिथे ते धोक्यात आणि संवेदनशील प्रजातींच्या सूचीमध्ये आहेत.

‘ख्रिसमस बर्ड काउंट्स’ या पक्षीप्रेमींच्या गटातर्फे प्रत्येक डिसेंबरमध्ये पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या मोजली जाते. यांनी कॅलिफोर्नियामधील पाच भागांमध्ये फेरुजिनस हॉकची संख्या नोंदवली होती. यात समजले की, २५ वर्षांच्या कालावधीत अधिवासाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या घटली आहे, मात्र त्याच कालावधीत कॅलिफोर्नियामध्ये हिवाळ्यात फेरुजिनस हॉक्सचे प्रमाण वाढले आहे.

याचे संभाव्य कारण म्हणजे फेरुजिनस हॉक एकाच अधिवासात राहणाऱ्या अन्य शिकारी पक्ष्यांच्या तुलनेत मोठी शिकार पसंत करतात, असे पक्षी या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय, फेरुजिनस हॉकने आपला नवीन अधिवास म्हणून ओसाड शेतजमिनींशी जुळवून घेतले आहे, तसेच आपल्या शिकारीमध्ये विविधतेचा स्वीकार करून आपल्या आहाराचा विस्तार केला आहे. फेरुजिनस हॉकच्या पिल्लांमध्ये पहिल्या वर्षात मृत्युदर जास्त असतो. त्यामुळे या प्रजातीच्या संवर्धनासाठी त्यांच्या विविध वयोगटांचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे.

फेरुजिनस हॉकसारखे शिकारी पक्ष्यांचे अस्तित्व हे त्या परिसराच्या आरोग्याचे चिन्ह मानले जाते. त्यामुळे फेरुजिनस हॉक्ससारख्या गवताळ प्रदेशातील पक्ष्यांच्या संवर्धनाला बळ देणे आणि त्यांच्या अधिवासाबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-10-02T08:00:53Z dg43tfdfdgfd