-सुनीत पोतनीस
लंडनच्या रॉयल सोसायटीच्या चॅलेंजर या सागरतळ मोहिमेमुळे खोल समुद्रतळ संशोधनास चालना मिळाली. त्यातून गेल्या दशकात मोठी माहिती उजेडात आली आहे. खोल सागरतळाशी असलेले खनीज साठे हे इतर जमिनीत असलेल्या खनीजसाठ्यांच्या सुमारे पाचपट अधिक आहेत. ही खनिजे अधिक समृद्धही आहेत. परंतु ही खनिजे तिथून काढणे अत्यंत कष्टाचे आणि खर्चिक आहे.
कोबाल्ट, जस्त, मँगनीज, तांबे, तसेच इतर दुर्मिळ खनिजांचे अफाट भांडार समुद्रतळाशी आहे. सागरतळाशी ही खनिजे तीन प्रकारांमध्ये आढळतात. बटाट्याच्या आकाराचे बहुधातू गोटे किंवा गट्टे (पॉलीमेटालिक नोड्यूल ) हा प्रकार समुद्रतळातील सपाटीवरील भागात आढळतो. या नोड्यूल्समध्ये दुर्मिळ पृथ्वी घटक (रेअर अर्थ एलिमेंट्स), कोबाल्ट, निकेल, तांबे, यट्रीयम, मॉलिब्डेनम, टंगस्टन वगैरे खनिज धातू मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात. दुसरा प्रकार, म्हणजे बहुधातू सल्फाइड्स हा सागरतळांमधील हायड्रोथर्मल व्हेंटमच्या परिसरात आढळणारा प्रकार तांबे, शिसे, सोने, चांदीने समृद्ध आहे. तर कोबाल्टसमृद्ध फेरो मँगेनीज क्रस्ट हे तिसऱ्या प्रकारचे खनिज साठे समुद्रतळातील पर्वत परिसरातील खडकांवर आढळतात.
सागरात आढळणाऱ्या बहुधातू गोट्यांमध्ये येट्रीयम, लँथायम, युरोपियम, होलमियम, स्कॅनडीयम वगैरे १७ प्रकारचे दुर्मिळ खनिज प्रकार आढळतात. त्यांचा वापर उच्चतंत्रज्ञान विषयक उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो. यांची संयुगे विद्युतउद्योग, एक्स-रे, कॅमेराचे भिंग, हार्ड डिस्क ड्राइव्ह, टीव्ही स्क्रीन, न्यूक्लियर रिऍक्टर्स, एलसीडी, लोहचुंबक, मोबाइल फोन आणि विद्युत वाहनांच्या बॅटरीच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
आता समुद्रातील अशा अपार संपत्तीचा वेध घेऊन ती मिळविण्यासाठी अनेक देश इच्छुक आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सीबेड ऑथारिटीने (आयएसए) भारतासह सात देशांना परवाने दिले आहेत. त्यासाठी भारत सरकारद्वारे हिंदी महासागराच्या तळातील खोलवर दुर्मिळ खनिजे आणि धातूंचा शोध घेण्यासाठी सुमारे ९० मीटर लांबीचे जहाज भारतीय शिपयार्ड द्वारे बांधले जात आहे हे जहाज समुद्रात वैज्ञानिक सर्वेक्षण करील. (पूर्वार्ध)
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-10-02T08:00:53Z dg43tfdfdgfd