स्वराज्याची राजधानी रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सजली

अलिबाग – किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी हिंदवी स्वराज्याची राजधानी सजली आहे. गडावरील राजसदरेवर राजवाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले आहे.

जेष्ठ शुध्द त्रयोदशीला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. या घटनेला उद्या ३५० वर्ष पुर्ण होत आहेत. त्यामुळे हा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. सोहळ्याची तयारी पुर्ण झाली असून गडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तिथे राजसदरेची भव्य साधर्म्य असलेली प्रतिकृती साकारण्यात आली आहे. कला दिग्दर्शक अमोल विधाते यानी या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. सहा दिवस ५०० कामगारांनी महेनत करून हा सेट अप तयार केला आहे. गडावर ही प्रतिकृती साकारणे मोठे आव्हानात्मक काम असल्याचे विधाते यांनी सांगितले आहे.

मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला, तसेच होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आला आहे. तर त्याच बरोबर शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला झेंडुच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. गडावरील राजवाडा परीसर, जगदिश्वर मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी फसाड रोषणाई करण्यात आली आहे. त्यामळे किल्ल्याचा परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे. हजारो शिवभक्त गडावर दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे गडावर चैतन्याचे वातावरण आहे.

2023-06-01T13:57:31Z dg43tfdfdgfd