कुणा शोभा जैन यांच्या तीनमजली बंगल्यात आधी एकच स्वयंपाकघर असताना आता मुलांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह केल्यामुळे मांसाहारी मुदपाकखाने निरनिराळे आहेत, यासारखे बारकावे विमला पाटील नेमके लिहायच्या. वाचकांची मने हे असे वैचित्र्यपूर्ण तपशीलच (जैनांच्या बंगल्यात मांसाहार आदी) टिपत असतात, याची पक्की जण त्यांना होती. शिवाय, ‘शोभा जैन म्हणाल्या,’ अशी सरळ अवतरणांची पेरणीच विमला पाटील यांच्या लिखाणात असल्याने तपशिलांमध्ये कोरडेपणा नसायचा. लिखाणाचा हेतू वाचकाशी संवाद हाच आहे आणि त्या संवादातून पुढे आपला मुद्दा आपण वाचकाच्या गळी उतरवायचाच आहे, हा त्यांचा शिरस्ता. तो कधीही न सोडल्यामुळे ‘कुटुंबात समंजसपणा असेल तर आंतरधर्मीय विवाह यशस्वीच होतात’ हा मुद्दा अगदी २०१२ मध्ये त्यांनी मांडला. तर ‘पदवीचा, शिक्षणाचा उपयोगच नाही ही जाणीव सुशिक्षित गृहिणींना सतावते आहे’ किंवा ‘महिलांनी बँकेतून कर्ज काढण्यासाठी ‘पतीची संमती आणा’ या अटीची गरजच काय?’ हे मुद्दे १९७० च्या दशकात त्या मांडू शकल्या. ‘फेमिना’च्या संपादकपदी (१९७३ ते १९९३) असताना आणि त्यानंतरही त्यांनी ‘पर्सनल’ला ‘पोलिटिकल’पर्यंत सहज नेणाऱ्या या शैलीत लिहिले.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : केकी दारूवाला
विमला पाटील यांच्या निधनवार्तांमध्ये (३० सप्टेंबर रोजी) त्यांच्या वयाचा उल्लेख (९१ वर्षे) जसा नव्हता, तसाच ‘व्हिवा पश्चिम’ या वरळीतल्या रेस्तराँचाही नव्हता किंवा जन्माने त्या मुंबईकर, हाही उल्लेख नव्हता. ‘डीटेल्स हवेच’ म्हणून संपादकपदी असताना पाटील यांनी किती तरी लेखांचे खर्डे परत पाठवले असतील; त्या प्रकारच्या पत्रकारितेचा काळच आता मागे पडून ‘तुम्हीच लेखाची लांबी कमी करून द्या’ असा काळ उजाडला आहे. पण या बदलत्या काळातही पाटील यांनी स्वत्व न सोडता लिखाण सुरू ठेवले. इंटरनेट-नियतकालिकांतूनही त्यांनी लिखाण केले. मुंबईच्या खार, दादर आदी भागांतील सुखवस्तू सारस्वतांच्या मुली जसे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पुढे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जात, तसेच विमला यांनीही केले… एलएल.बी.नंतर लंडन युनिव्हर्सिटीतून पत्रकारिता शिकताना ‘द टेलिग्राफ’मध्ये उमेदवारी करून त्या मुंबईत आल्या, तेव्हा (१९५९) ‘फेमिना’ नुकते सुरू झाल्याने तिथे संधी मिळाली. पण १९६१ ते ६६ या पाच वर्षांत ‘युसिस’मध्ये (युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सेंटर- इथे जयवंत दळवीही होते) काम करून, ‘स्पॅन’ मासिकासाठी हॉलीवूड ताऱ्यांच्या तसेच भारतीय गायक-वादकांच्या मुलाखती घेऊन त्या ‘फेमिना’त परतल्या. ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धा हाताळणे हा कामाचाच भाग असल्याने, नंतरही फॅशन शोंचे आयोजन, पुढे ऐतिहासिक स्थळांवरल्या ‘ध्वनिप्रकाश खेळां’चे लेखन, अशीही मुशाफिरी त्यांनी केली. छापील पत्रकारितेचे आणखी एक पान त्यांच्या निधनाने मिटले.
2024-10-01T21:10:19Z dg43tfdfdgfd