जंगलाची मशागत करणारे हत्ती

- अदिती जोगळेकर

हत्ती हा आफ्रिकन आणि आशियायी जंगलांमधील सर्वांत मोठा सजीव आहेत. त्यांच्याशिवाय या जंगलांची कल्पनाच करता येत नाही. थायलंड आणि आफ्रिकेत हत्तीसफारी अतिशय लोकप्रिय आहेत. हत्तीचे महत्त्व तेवढ्यापुरतेच नाही. ते आफ्रिकेमधील पर्जन्यवनांची मशागतही करतात. सेंट लुइस विद्यापीठातील पर्यावरणतज्ज्ञांनी आफ्रिकन पर्जन्यवनांमधील आठशेपेक्षा अधिक वनस्पती प्रजातींचा अभ्यास केला. त्यांचा अभ्यास असे सुचवतो, की हत्तींची चरण्याची विशिष्ट पद्धत पर्यावरणासाठी फायदेशीर असते. माळी जसे तण काढून बागेतील झाडांची मशागत करतात; तसेच काम जंगलात हत्ती करतात.

पर्जन्यवनांतील वनस्पतींमध्ये सूर्यप्रकाश आणि पोषकद्रव्यांसाठी चढाओढ सुरू असते. काही वनस्पतींच्या वाढीचा वेग इतरांपेक्षा जास्त असतो, तर काही झाडे हळूहळू वाढतात. भराभर वाढून इतरांपेक्षा उंच होणाऱ्या झाडांचे लाकूड हलके आणि कमी कार्बनघनतेचे असते. याउलट संथ वाढणाऱ्या वृक्षांचे लाकूड जड आणि जास्त कार्बनघनतेचे असते. हलक्या लाकडाची झाडे उंच वाढत राहिली, तर जास्त कार्बन साठवणाऱ्या; पण संथपणे वाढणाऱ्या झाडांची वाढ खुंटते. हत्तींच्या आहारामध्ये मुख्यतः हलक्या झाडांचा समावेश असतो. त्यांच्या चरण्यामुळे या वनस्पतींची वाढ आणि संख्या दोन्ही आटोक्यात राहते; शिवाय त्यांच्या विष्ठेमधून जड लाकडाच्या वनस्पतींच्या बिया जंगलात लांबपर्यंत विखुरतात. अशा प्रकारे ते पर्जन्यवनांमधील मोठे वृक्ष टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. इतकेच नव्हे, तर ही पर्जन्यवने हत्ती नसलेल्या पर्जन्यवनांपेक्षा प्रतिवर्षी सहा ते नऊ टक्के अधिक कार्बन साठवून ठेवतात आणि तापमानवाढ कमी करण्यातही हातभार लावतात. अवैध शिकारीमुळे मुळातच धोक्यात आलेल्या हत्तींची संख्या खालावत राहिली, तर पर्जन्यवनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर त्याचा थेट परिणाम होईल.

2023-05-26T03:58:43Z dg43tfdfdgfd