हरितवायू उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. मात्र, जागतिक तापमान वाढीसाठी २५ टक्के कारणीभूत असलेल्या मिथेन वायूचे जगभरातील केवळ १३ टक्के उत्सर्जन नियमांच्या अधीन असल्याचे धक्कादायक वास्तव संशोधकांनी मांडले आहे. याचा अर्थ, उर्वरित मिथेन उत्सर्जन अनियंत्रित आणि नियमबाह्य रीतीने सुरू आहे.
लंडनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मिथेन वायूसंबंधी जगभरातील २८१ धोरणांचे विश्लेषण केले. यापैकी २५५ धोरणांची सध्या अंमलबजावणी होत आहे. शेती, ऊर्जानिर्मिती आणि कचरा यांसारख्या मिथेनच्या सर्व मानवनिर्मित स्रोतांचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला. मिथेनचे अनेक स्रोत ज्ञात नसल्याचे यात समोर आले; त्यामुळे मिथेनला आळा घालण्यासाठी बनविलेली धोरणे कितपत प्रभावी आहेत, याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्याचेही अभ्यासकांनी नोंदवले. ‘वन अर्थ’ या विज्ञान पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
सन १९७४पासून मिथेनविषयक धोरणांमध्ये वाढ होत आहे. मात्र, मिथेनच्या जैविक स्रोतांसंबंधीच्या धोरणांच्या तुलनेत कोळसा, पेट्रोलियम आणि गॅस यांसारख्या जीवाश्म मिथेनसंबंधीची धोरणे कमी कडक असल्याचे यात आढळले.
पॅरिस करारानुसार, तापमानवाढ दीड अंशांपर्यंत रोखण्याचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर मानवनिर्मित मिथेन उत्सर्जन २०२०च्या तुलनेत, २०३०पर्यंत ४० ते ५० टक्के कमी करणे आवश्यक आहे. मिथेनचे स्रोत अचूकपणे ओळखून त्यांची मोजणी करणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. मिथेन उत्सर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान विकसित करणे उपयुक्त ठरू शकते. व्यापक धोरणे, मोठ्या स्रोतांच्या ठिकाणी उपाययोजनांची अंमलबजावणी यांद्वारे मिथेन उत्सर्जनाला लक्षणीय प्रमाणात आळा घालणे शक्य आहे, याकडे संशोधकांनी लक्ष वेधले आहे.
2023-05-26T04:13:42Z dg43tfdfdgfd