ZP SCHOOL UNIFORM: विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश कधी मिळणार? संभ्रम कायम

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांसह गणवेशाचे वाटप करण्यात येते. यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात येणार आहे. दुसऱ्या गणवेशाचा निर्णयसुद्धा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ६६ हजार ५६३ विद्यार्थी यासाठी पात्र असून त्यासाठी १ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, एससी, एसटी आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. त्यानुसार समग्रच्या २०२३-२४च्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या दोन गणवेश संचाकरिता ६०० रुपये मंजूरही करण्यात आले आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षक परिषदेकडे २०२३-२४साठी १५१५ शाळांतील ६६ हजार ५६३ विद्यार्थ्यांची ऑॅनलाइन नोंदणीही पूर्ण केली आहे. मात्र, शैक्षणिक सत्र सुरू होण्याची तारीख तोंडावर येऊनही शासनाकडून कोणत्याही सूचना नसल्याने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती सर्व संभ्रमात होते.

परंतु, २९ मे रोजी २०२३ रोजी शिक्षण परिषदेने काढलेल्या पत्रामुळे हा संभ्रम दूर झाला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या एका गणवेशासाठी ३०० रुपयांप्रमाणे विद्यार्थी संख्येनुसार जिल्हास्तरावर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महापालिकेकडे निधी पाठविण्यात येईल. यानंतर शाळांना गणवेश खरेदी करता येईल.

दरम्यान, असे असतानाही दुसऱ्या गणवेशाबाबत मात्र, अद्यापही संभ्रम कायम आहे. शिक्षण परिषदेच्या पत्रानुसार, दुसऱ्या गणवेशाचा लाभ शासन निश्चित करणार असून तो गणवेशही याच शैक्षणिक वर्षात दिला जाईल.

2023-06-01T09:57:53Z dg43tfdfdgfd