MAHARASHTRA MEDICAL COLLEGES: राज्यात ८ नव्या शासकीय वैद्यकीय कॉलेजांना मान्यता; MBBS च्या ८०० जागा वाढणार

-रोहन टिल्लूnew medical colleges in maharashtra 2024: राज्यभरात वैद्यकीय शिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेत राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. या आठ कॉलेजांच्या मान्यतेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने या परिषदेकडे पाठवला होता. परिषदेने हा प्रस्ताव सुरुवातीला फेटाळल्यानंतर वैद्यकीय विभागाने आरोग्य मंत्रालयाकडे दाद मागितली होती. अखेर या महाविद्यालयांना मान्यता देण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिल्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने ही मान्यता दिली. या मान्यतेमुळे राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय विद्यालयात ८०० जागा वाढणार आहेत. विशेष म्हणजे या जागा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीपासूनच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

New govt medical colleges in maharashtra 2024 latest news: राज्यभरात वैद्यकीय शिक्षण विभागाची २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तर खासगी आणि शासकीय महाविद्यालये मिळून २२ हजार ८३३ जागा आहेत. त्या तुलनेत ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संथ्या प्रचंड आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आठ वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडे पाठवला होता. मात्र या महाविद्यालयांना विविध कारणांनी मंजुरी देता येणार नाही, असे आयोगाने म्हटले होते.

याविरोधात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने थेट आरोग्य मंत्रालयाकडे दाद मागितली होती. आरोग्य मंत्रालयाने सुनावणी घेत या महाविद्यालयांना मान्यता देण्याचे निर्देश एनएमसीला दिले. त्यानंतर या आठही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्याचे आदेश ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले.

कुठे आहेत नवी शासकीय महाविद्यालये? गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, भंडारा आणि अंबरनाथ याठिकाणी नवीन मेडीकल कॉलेज सुरू होणार आहेत.

‘एमयुएचएस’शी संलग्नता आवश्यक-केंद्र सरकारकडून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नवी शासकीय महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सरकारी कॉलेजमध्ये ८०० जागा उपलब्ध होतील. केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतर या कॉलेजांना महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाची (एमयुएचएस) संलग्नता मिळवणे आवश्यक आहे. एमयुएचएससोबत ही महाविद्यालये संलग्न झाल्यानंतरच या ८०० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होतील. ही प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल. - दिनेश वाघमारे. प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-10-01T14:27:45Z dg43tfdfdgfd