म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर केला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभागात परीक्षा दिलेल्या एक लाख ६४ हजार ५४५ विद्यार्थ्यांपैकी पैकी एक लाख ५१ हजार १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८५ अशी निकालात विभाग राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. लातूर विभागातून ८८ हजार ५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७९ हजार ५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी बाजी मारली असून, छत्रपती संभाजीनगर विभागात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ३. ७३ टक्क्यांनी, तर लातूर विभागात ६.८४ टक्क्यांनी अधिक आहे.
बारावी निकालात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झाली आहे. राज्यातील अन्य मंडळांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यात कोकण विभागाने निकालात पहिले स्थान मिळविलेले आहे. कोकणातील ९६.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात एकूण १४ लाख १६ हजार ३७१ मुलांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.२५ असे आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड व जालना या पाच जिल्ह्यातून एक लाख ६६ हजार ५५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ६४ हजार ५४५ विद्यार्थी परीक्षेला बसले तर एक लाख ५१ हजार १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९१.८५ आहे. लातूर विभागातील नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातून ८९ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ८८ हजार ५१ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७९ हजार ५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.३७ टक्के असे आहे.
मुलीच अव्वलबारावी निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा दोन्ही विभागात मुलीच अव्वल आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातून ६७ हजार ६५२ मुलींनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ६३ हजार ६३१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत उत्तीर्णतेचे हे प्रमाण ३.७३ टक्केने अधिक आहे. लातूर विभागातून ३९ हजार २१८ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ३६ हजार ९३१ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत उत्तीर्णतेचे प्रमाण ६.८४ टक्क्यांने अधिक आहे.
विभागातील शाखानिहाय निकाल..शाखा परीक्षार्थी उत्तीर्ण विद्यार्थी
विज्ञान ९२,२१८ ८९,०४०
वाणिज्य ११,८६० १०,८७८
कला ५६,६०८ ४७,८०६
व्होकेशनल ३,४९९ ३,०९७
टेक्निकल सायन्स ३६० ३२७
..
मराठवाड्यातील जिल्हानिहाय संख्या
जिल्हा....... परीक्षार्थी............. उत्तीर्ण
छत्रपती संभाजीनगर ५९,५२१ ५५,६९३
बीड ३७,९१७ ३५,४४५
परभणी २३,४४९ २०,६१८
जालना ३०,६९३ २८,२०२
हिंगोली १२,९६५ ११,१९०
नांदेड ३८,२७६ ३३,९०१
धाराशिव १५,६३० १४,०२९
लातूर ३४,१४५ ३१,६४२
...
राज्यातील विभागनिहाय निकालाची टक्केवारी
विभागीय मंडळ निकालाची टक्केवारी
कोकण ९६.०१
कोल्हापूर ९३.२८
अमरावती ९२.७५
पुणे ९३.३४
छत्रपती संभाजीनगर ९१.८५
नाशिक ९१.६६
लातूर ९०.३७
नागपूर ९०.३५
मुंबई ८८.१३
2023-05-26T11:55:45Z dg43tfdfdgfd