VIKHROLI NEWS | विक्रोळीकरांचा विरोध, निर्णय रद्द करण्याची मागणी

Vikhroli Redevelopment

मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगर येथील मुंबई महापालिका शाळेसाठी आरक्षित असलेला मोक्याचा भूखंड एका खासगी संस्थेला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. या भूखंडावर खासगी शाळा उभारण्यात येणार असून याला विक्रोळीकरांनी तीव्र विरोध केला असून घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

विक्रोळी कन्नमवार नगर येथील भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय गेल्या काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र स्थानिकांनी याला विरोध केल्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबून हा भूखंड खासगी संस्थेला देण्याचा घाट महापालिकेने घातला आहे.

विक्रोळीतील 'त्या' मुख्याध्यापकाच्या समर्थनार्थ विद्यार्थी, शिक्षकांचा मोर्चा

सध्या कन्नमवार नगर येथील महात्मा जोतिबा फुले हॉस्पिटलचा पुनर्विकास सुरू असल्यामुळे या आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी विक्रोळीकरांनी केली होती. परंतु याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करत हा भूखंड खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रद्द करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद परब यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे.

Vikhroli Flyover : विक्रोळी उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्ण

पार्किंगचा प्रश्न सोडवा

सध्या पुरेसे वाहनतळ नसल्यामुळे नागरिक आपल्या गाड्या पदपथ व रस्त्यावर उभ्या करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भर रस्त्यात चालावे लागत आहे. त्यामुळे पार्किंग ही आता विक्रोळीकरांची गरज बनली आहे. त्यामुळे खासगी संस्थेला देण्यात येणार्‍या भूखंडावर वाहनतळ उभारून पार्किंगचा प्रश्न सोडवण्यात यावा, अशी मागणीही विक्रोळीकरांनी केली आहे.

मिलिंद परब, सामाजिक कार्यकर्तेया भागात मुंबई महापालिकेची शाळा असताना अजून एका शाळेसाठी भूखंड देणे योग्य नाही. विक्रोळीत मोठ्या प्रमाणात इमारतींचा पुनर्विकास होत असून येथील लोकसंख्येसह वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या भूखंडाचा वापर पार्किंगसाठी करण्यात यावा, असे विक्रोळीकरांचे म्हणणे आहे.

2025-06-10T06:14:32Z