SINDHUDURG THEFT : कुडाळ पोलिस हद्दीत सहावी घरफोडी उघड!

कुडाळ : कुडाळ पोलिस ठाणे हद्दीत पिंगुळी-देवूळवाडी येथे सोमवारी सकाळी सहावी घरफोडी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घरफोडीसह मागील पाच घरफोडी मिळून एकूण सहाही घरफोडीमध्ये कुडाळ पोलिस स्थानकांच्या पोलिस कोठडीत असलेला संशयित रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी (आकेरी-घाडीवाडी) याचाच समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

कुडाळ पोलिस हद्दीतील पिंगुळी-देऊळवाडी येथे घरफोडी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद बाळकृष्ण सोमा पावसकर, (72, मूळ रा.पावशी चर्मकारवाडी ता.कुडाळ, सध्या रा. देऊळवाडी-पिंगुळी) दिली होती. त्यानुसार पोलिस घटनास्थळी गेले. चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप कटावणीसारख्या हत्याराने दरवाजाची कडी-कोंयडा तोडून घरात प्रवेश केला आणि जवळपास 93 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

यामध्ये 5 हजार रु. किमतीचा जुना चांदीचा कलश, 7 हजार रु. किमतीची चांदीची गणपतीची मूर्ती, 1500 रू. किमतीच चांदीचे निरंजन, 1हजार रूपये किंमतीचा चांदीचा करंडा, 500 रुपये किमतीची चांदीचे पैजण जोड, 500 रूपये किमतीच्या चार ग्रहांचे खडे, चांदीच्या अंगठ्या, 2 हजार रूपये किंमतीचे चांदीचे नाणे, 10 ग्रॅम वजनाची दोन चांदीची नाणी, 500 रूपये किंमतीचे 3 मोठे लोखंडी कोयते व एक लहान लोखंडी कुर्‍हाड,25 हजार रुपये किमतीचा सोन्याचे रिंग जोडख , 50 हजार रोख रक्कम मिळून सुमारे 93 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला.

याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा 21 मे रोजी रात्री 9 वा. ते 9 जून रोजी सकाळी 6.30 वा.च्या मुदतीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहा. पोलिस निरीक्षक श्री.पालवे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलिस हवालदार श्री.तिवरे करीत आहेत.

2025-06-10T01:07:57Z