SATARA NEWS : देवापूर पुलावर वाजतेय धोक्याची घंटा

देवापूर : सातारा आणि सांगली जिल्ह्याला जोडणारा म्हसवड-दिघंची मार्गावरील देवापूर येथील ओढ्याच्या पुलाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. यामुळे हा पूल सध्या नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे. पुलाच्या दोन्हीही बाजू खचल्या आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

देवापूर हे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेले गाव आहे. कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत येण्या जाणार्‍या नागरिकांचे स्वागत सध्या रस्त्यावरील खड्डे आणि धोकादायक पुलाने होत आहे. देवापूरच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या ओढ्यावरील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांच्या वाहनांचेही नुकसान होत आहे.

गंगोती तलावातील ओव्हरफ्लो पाणी आणि पावसाच्या पाण्याने सदरचा पूल हा पाण्याखाली गेला होता. पाण्याला प्रचंड वेग असल्याने पुलावरील डांबर निघून त्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सदरचा पूल हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. सध्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने सदरच्या पुलाची डागडुजी करून नवीन पुलाची निर्मिती करण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मार्गाची डागडुजी व ओढ्यावरील पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तात्यासाहेब औताडे, सरपंच, देवापूरसदरचा पूल पावसाच्या पाण्याने खचला असून हा पूल धोकादायक पातळीवर आहे. संरक्षक कठड्याचीही दुरवस्था झाली आहे. देवापूर ग्रामपंचायतीने नवीन पुलासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

2025-06-10T00:36:28Z