सांगली : आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांनी दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबविले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाने ही कारवाई केली. या कारवाईत 19 जणांकडून तलवार, कोयता, एडका, सुरा अशी घातक शस्त्रे जप्त केली, तर गांजा ओढणार्या 43 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत खुनांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तसेच धारदार हत्यारे घेऊन फिरणार्या तरुणांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, अमली पदार्थाची विक्री, बेकायदा दारू विक्री, चोरीच्या उद्देशाने फिरणारे संशयित, अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
दोन दिवसाच्या कारवाईत तलवार, कोयता, सुरा, एडका बाळगणार्या 19 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गांजा ओढणार्या 17 जणांविरुद्ध एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणार्या 43 जणांवर कारवाई करण्यात आली. बेकायदा दारू विक्रीबद्दल 45 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून देशी, विदेशी दारूचा साठा, दोन दुचाकी, असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून जिल्ह्यात आलेल्या पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर हद्दपारीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पदरित्या मुद्देमाल घेऊन फिरणार्या दोघांवर कारवाई करण्यात आली. अवैध दारू विक्री, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, दारू पिऊन वाहन चालवणे, याबद्दल एकूण 178 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सर्व उपअधीक्षक, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी अशा एकूण 77 अधिकारी आणि 491 कर्मचार्यांनी भाग घेतला.
2025-07-06T00:46:16Z