SANGLI : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा

सांगली ः ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..., जय भवानी जय शिवाजी..., छत्रपती संभाजी महाराज की जय...’ असा जय-जयकार करीत सांगलीत सोमवारी देवदर्शन पदयात्रा काढण्यात आली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे या पदयात्रेचे आयोजन केले होते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे सांगलीत आयोजन केले होते. सायंकाळी येथील मारुती चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात झाली. पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारुढ मूर्ती ठेवण्यात आली होती, तसेच अब्दागिरी, मशालींच्या प्रकाशाने पदयात्रेस शोभा आली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, पर्यटन, खणिकर्ममंत्री शंभूराज देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उपस्थित होते. मारुती चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेत सर्वात पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती होती. भगवे फेटे बांधून अनेक शिवभक्त यात्रेत सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजराने परिसरातील वातावरण शिवमय बनले होते.

हत्ती, घोडे खास आकर्षण

देवदर्शन पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत आणि शिवरायांचा जय-जयकार करीत अनेक शिवभक्त सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा करून वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. हत्ती, घोडे हे या यात्रेतील खास आकर्षण होते. पदयात्रा हरभट रोड, गणपती मंदिर, सराफ कट्टा, बदाम चौक, काळा मारुती मंदिर, पंचमुखी मारुती रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आली. तिथे पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी सिद्धार्थ गाडगीळ, बाळासाहेब बेडगे, श्रीकांत शिंदे, हणमंत पवार, मनोहर सारडा, बजरंग पाटील, मिलिंद तानवडे आदी उपस्थित होते.

2025-06-09T23:52:48Z