Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally) काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. या विजयी मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचेच भाषणं झाली. ठाकरे बंधूंच्या या भाषणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह महायुतीमधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले, तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंचं भाषण मराठीबाबत होतं. तर उद्धव ठाकरेंचं भाषण राजकीय होतं, असं महायुतीचे नेते म्हणत आहेत, असं संजय राऊतांना आजच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. यावर संजय राऊत म्हणाले की, महायुतीच्या नेत्यांना काहीही बोलू द्या, राज ठाकरेंचं भाषण कोणाला कळलं असेल तर त्यांनाही समजेल राज ठाकरेंनी महाराष्ट्राबाबत राजकीय भूमिका मांडलेली आहे. सक्ती लादून दाखवा, तुमची सत्ता विधानभवनात, आमची रस्त्यावर आहे, ही राजकीय विधानचं असतात, असं संजय राऊतांनी सांगितले. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यानंतर आम्हाला लढण्याचं बठ मिळालंय. अनेक राज्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केलं, असंही संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंसारखं बाळासाहेबांनी देखील एक विधान केलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी एअर इंडियाला ठणकावलं होतं.तुमची विमानं हवेत असतील पण रस्ते आमचे आहेत. हे देखील राजकीय विधानचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय बोलायचं हे त्यांना समजत नाही. ठाकरेंनी काय बोलायचं हे त्यांना सांगावं लागत नाही. लेखणी, वाणी आणि कुंचल्यातून ठाकरेंनी ते दाखवून दिलंय, असं संजय राऊतांनी सांगितले. लोकांना समजतंय काय होतंय, म्हणून कालच्या मेळाव्याला एवढा मोठा प्रतिसाद होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात जागोजागी रडण्याचे कार्यक्रम सुरु करावे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.