पुणे : शहरातील 100 मिळकतकर थकबाकीदारांनी तब्बल 334 कोटी 10 लाखांचा कर थकविला असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडूनच सर्वाधिक कर थकविणार्या 100 थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 1 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतींचा समावेश आहे.
महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीचा आकडा काही हजार कोटींमध्ये गेला आहे. त्यातच थकबाकीदारांची नावे महापालिकेकडून लपविली जात असल्याचा आरोप झाला होता. या पाश्वभूमीवर मिळकतकर विभागाने प्रमुख 100 थकबाकीदार आणि त्यांनी थकविलेली कराची रक्कम जाहीर केली आहे. या थकबाकीत बहुतांश जण हे महापालिकेतून वगळण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांतील आहेत. त्यामुळे आता या गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन झालेली असताना महापालिका या गावांचा कर कसा वसूल करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच काही मोठे थकबाकीदार नव्याने समाविष्ट 23 गावांमधील असून त्यांच्याकडील कर वसुलीसही शासनाने स्थगिती दिल्याने महापालिकेची ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने 2024- 25 या आर्थिक वर्षासाठी 14 लाख 80 हजार मिळकतींना बिले पाठविण्यात आली होती. त्यातील 9 लाख 29 हजार मिळकतींचा कर जमा झाला असून, हे उत्पन्न 2005 कोटी झाले आहे. तर प्रत्यक्षात अंदाजपत्रकात या विभागास 2 हजार कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, नागरिक कर भरत नसल्याने तसेच शासनानेही नवीन गावांच्या कर वसुलीवर बंधने घातल्याने महापालिकेकडून शहरातील थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत मागील 55 दिवसांत महापालिकेच्या वसुली पथक तसेच बँड पथकाकडून कारवाई करत 186 कोटींचा कर वसूल करण्यात आला आहे. या शिवाय, 150 मिळकती सील करण्यात आल्या आहेत. तर 125 हून अधिक नळजोड तोडण्यात आले आहेत. या शिवाय, ही कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी आणखी 10 नळजोड पथकेही तैनात करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
महापालिका हद्दीतील राज्यशासन व केंद्र शासनाच्या अनधिस्त असलेल्या शासकीय कार्यालयांनीही 93.24 कोटींचा कर थकविला आहे, याबाबत महापालिकेकडून संबंधित कार्यालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या असल्या तरी त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
2025-02-05T09:08:41Z