PALGHAR| पुढारी हा जनसामान्यांचा पुढारी : हितेंद्र ठाकूर

खानिवडे : विश्वनाथ कुडू

दैनिक पुढारी हे महाराष्ट्राचे जनपत्र असून लोकचळवळीतील पुढारी आहे. अशा शब्दात पुढारीच्या कार्याचा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी गौरव केला.

दैनिक पुढारी आणि बहुजन विकास आघाडी आयोजित आषाढ घन सावळा हा विठ्ठल भजनाचा जागर करणारा कार्यक्रम विरार येथील विवा कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी उद्घाटन सोहळ्याला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, पुढारीचे नॅशनल हेड संजीव कुलकर्णी आणि मुंबई मार्केटिंग हेड अमित तळेकर आदी उपस्थित होते.

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या भक्तिरसपूर्ण अभंगांनी यावेळी विरारकर भारावून गेले. या कार्यक्रमासाठी संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांचे भक्तिरसपूर्ण अभंग सादर झाले. सार्‍या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी भक्ती अर्थात आषाढी एकादशी ही रविवारी म्हणजेच आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विरार पश्चिम येथील जुने विवा महाविद्यालयाच्या सभागृहात पं. संजीव अभ्यंकर यांच्या भक्तिमय संगीताचा सोहळा पार पडला. या सोहळ्यास पुढारी वृत्तसमूह आयोजित बहुजन विकास आघाडी व वसई-विरार महानगरपालिका यांच्या विशेष सहकार्याने तसेच पॉवर्ड बाय वामन हरी पेठे ज्वेलर्स, असोसिएट स्पॉन्सर ऋणानुबंध ट्रस्ट, टेलिव्हिजन पार्टनर पुढारी आणि रेेडिओ पार्टनर 94.3 एफ एम टोमॅटो यांच्या सहभागाने सुश्राव्य भजनी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याचा शुभारंभ वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, पुढारीचे नॅशनल हेड संजीव कुलकर्णी, निवासी संपादक शशिकांत सावंत, मार्केटिंग हेड अमित तळेकर, मार्केटिंग टीमचे शिवराम सावंत, गायक पंडित संजीव अभ्यंकर, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, डॉ. प्रवीण क्षीरसागर, विवा कॉलेजचे संजीव पिंगुळकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी माजी आमदार ठाकूर पितापुत्र यांच्यासह वामन हरी पेठे ज्वेलर्सचे ब्रांच हेड अमोल बागवे तसेच बी.एस.टी.चे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी राजेश खानोलकर यांचा श्रीहरी विठ्ठलाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

या भक्तिमय संगीत रजनीचे प्रास्ताविक दै. पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत यांनी केले. या प्रास्ताविकात त्यांनी पुढारी हे निर्भीड वृत्तसमूह असून महाराष्ट्रात दररोज 18 आवृत्त्या प्रसिद्ध होत असून सर्व समाजाची नाळ जोडण्याचे काम दै. पुढारी करत असल्याचे सांगितले. तर प्रमुख अतिथी म्हणून बोलताना बविआचे लोकनेते माजी आ. हितेंद्र ठाकूर यांनी पुढारीच्या भक्तिमय संगीत रजनीच्या आयोजनाचे कौतुक केले. तसेच पंढरपूर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये भक्तीरसाचा कर्णमधुर सोहळा आयोजित केला म्हणून आभार व्यक्त केले.

सुमधुर अभंग व भक्तिमय रचना...

यावेळी पंडित अभ्यंकर यांनी एकाहून एक सरस सुमधुर शास्त्रीय रागातील अभंग व भक्तिमय रचना सादर केल्या. यातील आणिक दुसरे मज नाही आता, कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी कान्हा, ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग श्री गुरु सारखा असता पाठीराखा, समर्थ रामदास स्वामींचा अभंग ध्यान लागले रामाचे, तुकाराम महाराज यांचा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, श्रीराम जय राम जय जय राम, आता कोठे धावे मन... अशी एकापेक्षा एक सरस अभंग गाऊन अभंगवाणी सादर केली. या संगीत भक्ती संगीत करार्यक्रमाला विरारकरांनी मोठी उपस्थिती लावून विठ्ठलाच्या संगीतमय भक्तीत तल्लीन होऊन गायकीला चांगलीच दाद दिली.

शैलेश मिस्त्री, श्रोते आणि सिनियर सिटीझन व्हाईस प्रेसिडेंट विरारपुढारीने हा जो संगीत भक्तीचा कार्यक्रम आयोजित केला, तो तणावाच्या आयुष्यात एक सुखद गारवा देणारा आणि सरस्वती मातेची साधना म्हणून आम्हाला प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे वाटते आहे.

2025-07-06T06:41:20Z