PALAVA FLYOVER : विरोधकांच्या टिकेनंतर पलावा उड्डाणपूल सेवेत

नेवाळी : कल्याण-शीळ रस्त्यावरील सात वर्षांपासून काम सुरु असलेला पलावा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तांत्रिक काम अपूर्ण असल्याने उड्डाणपूल लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरताच ठाकरेंच्या शिवसेनेने उड्डाणपुलावर धाव घेतली होती. तर मनसेचे नेते राजू पाटील यांनी देखील टीका केली होती. अपूर्ण काम तातडीने सत्ताधार्‍यांनी काही वेळात पूर्ण करून घेत शुक्रवारी सायंकाळी पुन्हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.

बहुप्रतिक्षित कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपूल पूल शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकार्‍यांकडून शुक्रवारी सुरु करण्यात आला होता. काही वेळेतच हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. ठाकरे गटाचे पदाधिकारी पूलावर पोहचले. पूलाचे काम पूर्ण नसल्याचा आरोप करीत पूल सुरु करण्यास इतकी घाई का अशी टिका केली. इतकेच नाही तर पूलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे.

या बाबत तक्रार करुन ऑडिट करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती अशी टिका मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली. या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गट आणि मनसेवर टिका करण्यात आली आहे. वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी पूल काही वेळेकरती बंद केला आहे. उद्या तो पूल सुरु करणार ज्यांनी टिका केली आहे. त्यांच्या घराशेजारीच काम सुरु होते. ते त्यांनी का ? रोखले नाही अशी टिका शिंदे सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केली आहे. राजकारण तापल्यानंतर हा पूल परत वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

पलाव जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पलाव उड्डाण पूलाचे काम हाती घेतले गेले. हे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून खाजगी कंत्राटदाराकडून केले गेले. या पूलाच्या दोन मार्गिका आहे. या पुलाची एक मार्गीका तयार झाली. दुसरी मार्गिकेचे काम सुरु आहे. एका मार्गिकेवरुन वाहतूक जून अखेर सुरु होणार अशी माहिती शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली होती. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसेने एकत्रित येऊन या पूलावर आंदोलन केले होते. शुक्रवारी शिंदे गटाकडून आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या उपस्थितीत पलावा पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला. त्यानंतर दुपारी हा पूल लगेच वाहतूकीसाठी बंद केला गेला.

या पूलावर ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख राहूल भगत यांनी सांगितले की, पूल वाहतूकासाठी खुला करताच त्याठिकाणी वाहन चालकांच्या गाड्या स्लीप झाल्या. त्यामुळे हा पूल वाहतूकीसाठी बंद केला. पूलाचे काम पूर्ण झाले नसताना पूल घाई गडबडीत सुरु केला असल्याचा आरोप केला. तर मनसेने नेते राजू पाटील यांनी पूलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे असे ट्वीट करीत सत्ताधारी पक्षावर टिकेची झोड उठविली आहे.

पुलावरून कल्याण, डोंबिवलीत राजकारण तापले

ठाकरे आणि मनसेने केलेल्या टिकेवर शिंदे गटाचे उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी मनसे आणि ठाकरे गटाला टोला लगावला आहे. ज्यांनी टीका केली आहे. ते आमदार असताना त्यांच्या घराशेजारीच काम सुरु होते. ते त्यांनी का रोखले नाही वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी पूल काही वेळेकरती बंद केला आहे. काही गाड्या स्लिप झाल्या म्हणून आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की त्वरित पूल बंद करा पुलावर ऑइल होते ते दूर केल्यावर उद्या (शनिवारी ) तो पूल सुरु करणार. मात्र या पुलावरून कल्याण डोंबिवलीत राजकारण चांगलेच तापले होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी हा उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीस्तही खुला करण्यात आला आहे.

पलावा चौकातील कोंडी आता निळजे, काटई चौकांमध्ये

उड्डाणपुलावरून वाहतूक सुरु झाली असली तरी वाहतूक कोंडी एक चौक पुढे गेली आहे. कोंडीचे जंक्शन म्हणून ओळखलं असलेल्या पलावा चौकातील कोंडी आता निळजे, काटई आणि घारीवली चौकांमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे एक चौक पुढे गेलेली वाहतूक कोंडी कल्याण शीळ रस्त्यावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांची सुटका करणार अशी शक्यता कमी वाटत आहे.

2025-07-06T08:10:05Z