NDCC BANK | जिल्हा बँकेच्या एमडींचा राजीनामा मंजूर

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एम डी) संजय पाटील यांच्या विरोधात आंदोलन केल्यावर एमडी पाटील यांनी राजीनामा अस्त्र उगारले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावर बुधवारी (दि. ३१) रोजी पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊन त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक संचालक (एमडी) संजय पाटील विरोधात कंत्राटी कर्मचा-यांनी एप्रिल मध्ये केलेल्या आंदोलनात एमडीच्या वेतनवाढीवर कर्मचा-यांनी आक्षेप घेतला होता. तर, बॅंकेच्या काही कर्मचा-यांनी विभागीय सहनिंबधक यांच्याकडे एमडीच्या वेतन वाढी विषय लेखी तक्रार केली होती.

जिल्हा बँकेच्या तात्पुरत्या (कंत्राटी) ३७२ हून अधिक कर्मचारी तात्पुरत्या सेवकांना कायम करावे, वेतन वाढ द्यावी, मेडिक्लेम सुविधा लागू करावी, नियमित कर्मचा-यांप्रमाणे कंत्राटी कर्मचा-यांनाही रजा व सुविधा लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी ५ एप्रिल २०२४ पासून संपावर गेले होते. कर्मचा-यांनी याबाबतची नोटीस देखील दिली होती. २० दिवस होऊनही यावर तोड़गा न निघाल्याने आक्रमक झालेल्या कर्मचा-यांनी २४ एप्रिल रोजी बॅंकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी झालेल्या बैठकीत कर्मचारी व प्रशासक यांच्यात आक्रमक झालेल्या एका कर्मचा-यांना प्रशासकांनाच सुनावले होते. यातच काही कर्मचा-यांनी प्रशासक व व्यवस्थापकीय संचालक यांचे पगार वाढीचा मुद्दा देखील काढला.

वारंवार कर्मचा-यांकडून पगार वाढीचा विषय काढला जात असल्याने नाराज झालेल्या व्यवस्थापकीय संचालक पाटील यांनी त्यावेळी पदाचा राजीनामा प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे सोपविला होता. याबाबतचा अहवाल प्रशासक चव्हाण यांनी शासनाला पाठविला होता. दरम्यान पाटील यांच्या वेतन वाढीबाबत बॅंकेतील काही कर्मचा-यांनी विभागीय सहनिंबधक यांच्याकडे लेखी तक्रार केली.

दरम्यान बुधवारी (दि. ३१) व्यवस्थापकीय संचालक पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले आहे.

2024-08-01T03:30:36Z dg43tfdfdgfd