पिंपळगाव बसवंत : लोणवाडी शिवारात झालेल्या साडेतीन लाखांच्या जबरी चोरीचा छडा पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अवघ्या पाच तासांत लावत चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, ज्याने पैसे दिले, त्यानेच मित्रांच्या साथीने हे षडयंत्र रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दि. 31 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष पंडित वाघ (रा. पिंपळस रामाचे) याने त्याचा मित्र शुभम भराडे यांच्या निफाडमधील बँक खात्यातून साडेतीन लाख रुपये काढले होते. ते घेऊन तो पिंपळगावकडे निघाला असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी, 'माझ्या बहिणीचे नाव का घेतले' अशी कुरापत काढत वाघला बेदम मारहाण करीत पैशांची रोकड असलेली पिशवी घेऊन पोबारा केला होता.
याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली गेल्याने घटनाक्रमानुसार तपासचक्र फिरवले गेले. त्यात बँकेबाहेर वाघ, शुभम आणि त्याचा मित्र साधारण 10 मिनिटे बोलत असल्याचे आणि त्यातील एकाने पैशांचा फोटो काढल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. वाघ दुचाकीने कुंदेवाडीकडून लोणवाडीकडे जात असताना, संशयित लखन पवार आणि तुषार आंबेकर हे दोघे पाठलाग करीत असल्याचे दावचवाडी ग्रामपंचायत सीसीटीव्हीत दिसून आले.
घटनेच्या वेळी यश गांगुर्डेला वारंवार मोबाइलवरून कॉल झाल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी संशयित भराडे आणि गांगुर्डे यांची चौकशी केली, त्यात दोघांनी इतर संशयित साथीदार लखन पवार आणि तुषार आंबेकर यांची नावे सांगितली.
झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेतून भराडे आणि मित्रांनी आपल्याच मित्राचा विश्वासघात केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चारही संशयितांना अटक करत न्यायालयात हजर केले. या चौघांची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.
2025-02-05T04:49:57Z