NAGPUR CORPORATION | वाढलेले मतदार महापालिकेत कुणाला साथ देणार?

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : तीन वर्ष रखडलेल्‍या महापालिकेच्या निवडणुका येत्‍या चार महिन्याज होणार असल्याने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी, इतर पक्षातून दमदार दावेदारांचे इन्कमिंग सुरू झाले आहे. चार प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत वाढलेले मतदार कुणाला साथ देणार, याविषयीचे गणित आता सुरू झाले आहे.

2017 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. भाजपने 151 पैकी 108 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसला जेमतेम 29 जागांवर तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. प्रभागनिहाय वाढलेली मतदारांची संख्या सर्वच राजकीय पक्षांसाठी यावेळी निर्णायक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षापासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिल्यानंतर ही एकंदर प्रक्रिया सुरू झाली. नागपूरसह राज्यातील महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपली त्यानंतर महापालिकाचा कारभार प्रशासकाच्या हाती होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न केले.

Nagpur Municipal Corporation | आघाडीत बिघाडी, शिवसेनेचे स्वबळाचे संकेत

चार सदस्य प्रभाग पद्धती रद्द करून तीन सदस्य पद्धती आणली. प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यात आले. दरम्यान, सत्तांतर झाले आणि महायुतीची सत्ता आली. आता पुन्हा चार सदस्य प्रभाग पद्धती कायम ठेवण्यात आली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. 2017 ते 2025 ते आठ वर्षाच्या काळात दोन लोकसभा निवडणूक झाल्या. या काळात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळून आले. वाढलेल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी माजी नगरसेवक व इच्छुक असलेल्या लोकांना आता मेहनत घ्यावी लागणार आहे.

2011 नंतर जनगणनाच झाली नसल्याने त्याच लोकसंख्येचा आधार घेऊन महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. 2011 मध्ये शहराची लोकसंख्या 24 लाख 47 हजार 494 इतकी होती. आता यात मोठी वाढ झाली आहे. अर्थातच प्रत्येक प्रभागात सरासरी दहा ते पंधरा हजारांनी मतदार वाढले आहेत. काही मोठ्या प्रभागात तर हे प्रमाण अधिक आहे. 2022 मध्ये प्रभाग रचनेनंतर मतदारांची संख्या 22 लाख 33 हजार 866 इतकी होती. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत यात एक लाख 32 हजार 122 मतदारांची वाढवून ती 23 लाख 65 998 झाली त्यामुळे आता प्रभाग रचनेत सीमांकन निश्चित करताना पुन्हा काही भागांची अदलाबदल होणार आहे. जातीय समीकरणे देखील महत्त्वाची ठरणार आहेत. यामुळे निवडणुकीला काहीसा उशीर असला तरी रोज सकाळी विविध उद्यानमधून इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक संपर्कावर भर देताना दिसत आहे.

Nagpur Politics | जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले अखेर भाजपात, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना धक्का

2025-07-06T16:46:50Z