MUMBAI BMW HIT AND RUN: वरळी अपघातातील आरोपी मिहीर शाहला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Worli Mumbai BMW Hit and Run Update: दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी परिसरात 7 जुलै रोजी सकाळी मिहीर शाह याने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला मागून धडक दिली, यात दुचाकीवर मागे बसलेल्याचा कावेरी नाखवा नावाच्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिहीरला न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिहिर शाहला मुंबई पोलिसांनी 9 जुलै रोजी अटक केली होती. राज्यव्यापी 72 तासांच्या शोधानंतर त्याला अटक करण्यात आली. मिहीर शाह हा शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे.

या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (शिवरी कोर्ट) एस पी भोसले यांना सांगितले की हा एक 'क्रूर गुन्हा' आहे. आरोपींना पळून जाण्यास कोणी मदत केली याचा तपास करण्याची गरज आहे, त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दिवस पोलिस कोठडीत ठेवावे, तसेच गाडीची नंबर प्लेटही अद्याप मिळालेली नाही. आरोपींकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे की नाही आणि अपघातानंतर मिहीरने फेकलेल्या कारच्या नंबर प्लेटचे काय झाले हे शोधायचे असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद कोर्टाने फेटाळला

मिहीरला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही कारण नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला, परंतु तो न्यायालयाने फेटाळून लावला. रविवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर पोलिसांपासून पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या 24 वर्षीय मिहीरला अखेर 9 जुलै रोजी मुंबईजवळील विरार येथून अटक करण्यात आली.

मिहीरला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी परिसरात 7 जुलै रोजी सकाळी मिहीर चालवत असलेल्या बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या 45 वर्षीय कावेरी नाखवा या खाली पडल्या आणि त्या कारच्या चाकाखाली आल्या. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती प्रदीप नाखवा जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. तसेच या घटनेनंतर मिहीर आपली कार आणि ड्रायव्हर सोडून कला नगर परिसरातून ऑटोरिक्षात बसून त्याच्या मैत्रिणीच्या घरी पळून गेला. अटक केल्यानंतर मिहीरने आपणच गाडी चालवत असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. या प्रकरणी कोर्टाने त्याला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

2024-07-10T13:53:06Z dg43tfdfdgfd