कुडाळ : कुडाळ एसटी आगाराला सुसज्ज 5 नवीन एसटी बसेस मिळाल्या आहेत. सोमवारी दुपारनंतर या बसेस घेऊन चालक कुडाळला रवाना झाले असून, सायंकाळी उशिरापर्यंत या बसेस कुडाळ आगारात दाखल होणार आहेत. या बसेस मिळण्यासाठी आ. नीलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच एसटी प्रशासनाकडूनही नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच या बसेसचे आ. राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाल्यावर बसेस प्रवाशी सेवेत दाखल होणार आहेत.
आ. नीलेश राणे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी अलिकडेच एसटी अधिकार्यांसोबत बैठक आयोजित केली होती. आगाराच्या मागणीनुसार आ. राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून कुडाळ आगाराला नवीन दहा बसेस लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. एसटी प्रशासनानेही वरिष्ठ स्तरावर नवीन बसेसची मागणी केली होती. तसेच आ. राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार या आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस आणण्यासाठी कुडाळ आगारातून चालक व वाहक पुणे येथे पाठविण्यात आले होते. ते या बसेस घेऊन सोमवारी दुपारनंतर कुडाळला येण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत या बसेस कुडाळ आगारात दाखल होणार आहेत. आ. राणे यांच्या हस्ते या नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या बसेस बीएस 6 तंत्रज्ञान प्रणालीच्या असून अशोक लेलॅण्ड कंपनी बनावटीच्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्व मालकीच्या आहेत. या बसेस पुणे, अक्कलकोट, विजापूर अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्याचे एसटी प्रशासनाचे नियोजन असल्याची माहीती कुडाळ आगार प्रमुख रोहित नाईक यांनी दिली.
2025-06-10T01:16:30Z