MHADA LOTTERY: सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न महागलं! म्हाडाने वाढवल्या मुंबईतील घरांच्या किंमती

Mhada Mumbai Lottery 2024: सर्वसामान्यांना मंबई पुण्यासह राज्यभरात मोठ्या शहरांध्ये परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून देणारी संस्था अशा म्हाडाची ओळख आहे. परंतु आता ही ओळख पुसणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण म्हाडाने मुंबईतील घरांच्या किमती वाढवल्याचे वृत्त समोर येत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच मुंबईकरांसाठी 2000 घरांची लॉटरी काढली जाणार आहेत. ऑगस्टमध्येच ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहेत. यातील गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PAMY) उपलब्ध घरांच्या किमतीत तब्बल 4 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

इंटरेस्ट कॅपिटलायझेशनमुळे वाढल्या किंमती

इंटरेस्ट कॅपिटलायझेशनमुळे या किमती वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या वर्षी या घरांची किंमत 30 लाख 44 हजार रुपये एवढी होती, मात्र आता पुढील आठवड्यात निघणाऱ्या लॉटरीत या घरांची किंमत 34 लाख 70 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना ही घरं घेण्यासाठी 4 लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

ताडदेवमधील घरांच्या किमतीत बदल नाही

दरम्यान ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील एचआयजी उत्पादन गटातील घराच्या किमतीत म्हाडाने कोणताही बदल केला नाही अशी देखील माहिती आहे. ताडदेवमधील घराच्या किंमत गेल्या वर्षी 7 कोटी 57 लाख रुपये एवढी होती. यावर्षी देखील त्याच किमतीत ही घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच जुहूमधील विक्रांत सोसायटीमध्ये असलेली घरं देखील 4 कोटी 87 लाख रुपयांना उपलब्ध होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर होणार लॉटरी

तुम्ही मुंबईत स्वप्नातील घर घेण्याचा विचार करत असाल तर म्हाडा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही 2000 घरांची लॉटरी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. गोरेगाव, पवई, दिंडोशी, अँटोप हिल आणि विक्रोळीत परिसरात ही घरे आहेत. सर्वाधिक घरे ही गोरेगाव परिसरात असणार आहेत. या घरांच्या किंमती 34 लाखांपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

2024-08-01T13:03:07Z dg43tfdfdgfd