टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कन्हेरगाव परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचा प्रत्यय येत आहे. शुक्रवारी (दि. 4 जुलै) कन्हेरगाव येथे काही ठिकाणी ग्रामस्थांना बिबट्या दिसून आला. कन्हेरगाव शिवारातील सीना-माढा उपसा सिंचनच्या रस्त्यावर तसेच शिवाजी मोरे यांच्या शेतात व महादेव काळे, रामलिंग केदार यांच्या वस्तीजवळ बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याचा वन विभागाच्या अधिकार्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
कन्हेरगाव येथील रामलिंग बापू केदार यांच्या वस्तीवर रात्री अकरा वाजता बिबट्याने देशी गाईच्या कालवडावर झडप घालून जखमी केले. जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने केदार कुटुंबिय जागे झाले. ते बाहेर आल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सात वा. दरम्यान काळे व मोरे यांच्या शेताच्या बांधावर केळीच्या बागे शेजारून बिबट्या जात असताना काही शेतकर्यांना बिबट्या दिसला. यानंतर कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी वनविभागाचे कर्मचारी वनसेवक विकास नागनाथ डोके यांना फोनवरून ही माहिती देताच वनसेवक डोके हे पाच मिनिटात तेथे आले.
विशेष म्हणजे वनसेवक विकास डोके त्याठिकाणी आल्यानंतर बिबट्या रस्ता ओलांडून जाताना त्यांच्यासह अनेकांनी पाहिला. यामुळे डोके यांनीही गावात बिबट्या असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच यापूर्वी काशीनाथ हंबीरराव मोरे यांच्या शेळ्यांच्या कळपातील एक बोकडही बिबट्याने फस्त केले आहे. काशीनाथ मोरे हे त्यांच्याकडे असलेल्या 10 ते 15 शेळ्या चरण्यास सोडल्या असताना त्यांच्या डोळ्या देखत बिबट्याने त्यांचे बोकड झडप घालून पळवून नेऊन फस्त केले आहे. या घटनेने घाबरल्याने मोरे यांनी तेथून पळ काढला.
- बाबासाहेब लटके, वनपाल, मोहोळ-वनविभाग.कन्हेरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी बिबट्या दिसल्याचे ग्रामस्थांकडून व वनसेवकाकडून समजले आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास एकट्याने बाहेर पडण्याचे टाळावे, बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. आपल्या दारातील शेळ्या, बकरे, गाई या पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवावे. स्वतःची व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गावात पिंजरा लावण्यात येणार आहे. 2025-07-05T23:56:19Z